

Team India | IND vs AFG ODI
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध लखनौला झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात १७० धावांनी दणदणीत विजय मिळवला. बुधवारी झालेल्या या सामन्यात विजय मिळवल्याने भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने ही मालिका खिशात घातली असून आता तिसऱ्या वनडेत विजय मिळवत अफगाणिस्तानला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. भारताच्या विजयात कर्णधार शुभमन गिल, ईशान किशनसह अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांनी मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारताने अफगाणिस्तानसमोर ४०३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला ४४.३ षटकात सर्वबाद २३२ धावाच करता आल्या. डार्विश रसूली फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने पुन्हा फलंदाजीला आला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा डाव ९ व्या विकेटनंतर संपला.
या सामन्यात अफगाणिस्तानकडून रेहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी सलामीला फलंदाजी केली. यादरम्यान, पदार्पणवीर गुरबाजची विकेट घेतलीच होती, पण नो बॉल झाल्याने त्याला जीवदान मिळाले. गुरबाद आणि झाद्रान यांच्यात ५२ धावांची भागीदारीही झाली. पण ही भागीदारी ८ व्या षटकात गुरनूर ब्रारने तोडली. त्याने गुरबाजला केएल राहुलच्या हातून झेलबाद केले. गुरबाजने ३३ चेंडूत ४१ धाव केल्या. त्यानंतर १४ व्या षटकात झाद्रानला अर्शदीप सिंगने २१ धावांवर बाद केले.
मात्र नंतर रेहमत शाहने सदिकुल्लाह अटल याला चांगली साथ दिली. त्यांनी ५७ धावांची भागीदारी करत डाव पुढे नेला. त्यांची भागीदारी रंगत होती. पण त्याचवेळी २४ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने सदिकुल्लाहला ४२ धावांवर पायचीत पकडले. पाठपाठ कर्णधार हशमतुल्ला शहिदी (४) आणि नांगेयालिया खरोटी (६) यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. तसेच डार्विश रसूलीला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदानातून बाहेर जावे लागले. त्यामुळे अफगाणिस्तान संकटात सापडले होते. त्यातच राशीद खानही ३३ व्या षटकात १२ धावांवर बाद झाला. अल्लाह गझनफरही १ धावेवर माघारी परतला. या दोघांनाही अर्शदीप सिंगने माघारी धाडले. सलीम साफीला ९ धावांवर गुरनूर ब्रारने त्रिफळाचीत केले. या विकेट जात असतानाच रेहमत शाहने मात्र एक बाजू सांभाळली होती. त्याने अर्धशतकही केले. पण ४५ व्या षटकात त्यालाच प्रिन्स यादवने बाद करत अफगाणिस्तानचा डाव संपवला. रेहमत शाहने ८९ चेंडूत ८ चौकारांसह ७९ धावा केल्या. बिलाल सामी १४ चेंडूत २ धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर प्रिन्स यादवने २ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकात सर्वबाद ४०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने ११० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारांसह १५४ धावांची खेळी केली. तसेच ईशान किशनने ७९ चेंडूत १२५ धावांची शतकी खेळी केली. त्याने १४ चौकार आणि ७ षटकार मारले. रोहित शर्माने ३९ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. या तिघांशिवाय श्रेयस अय्यर (२६) आणि वॉशिंग्टन सुंदर (१९) यांनीच दोन आकडी धावसंख्या पार केली.
अफगाणिस्तानकडून नांगेयालिया खरोटीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर राशीद खानने ३ विकेट्स घेतल्या. अल्लाह गझनफर आणि सलीम साफी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.