IND vs NZ, 1st Test: भारताची विजयाची संधी हुकली, न्यूझीलंडची चिवट झुंज यशस्वी; पहिली कसोटी 'ड्रॉ'

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. शेवटच्या दिवशी ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल यांनी चिवट झुंज दिली.
India vs New Zealand 1st Test

India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन येथे झालेला पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत आता ०-० अशी बरोबरी राहिली आहे. सोमवारी (२३ नोव्हेंबर) पाचव्या दिवसाला सुरुवात झाली तेव्हा न्यूझीलंड २३३ धावांनी पिछाडीवर होते. विजयासाठी भारताला न्यूझीलंडने ही आघाडी भरून काढण्यापूर्वी ८ विकेट्सची घेण्याची आवश्यकता होती, तर सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंड फलंदाजांना विकेट वाचवून संपूर्ण दिवस खेळून काढण्याचे आव्हान होते. अखेर न्यूझीलंडने हे आव्हान पेलले असून त्यांनी हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

पाचव्या दिवशी दुसरे आणि तिसरे सत्र ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेलने खेळून काढले. त्यामुळे या सामन्यात शेवटच्या दिवसाचा १ तास बाकी असताना या सामन्यात निकाल लागणार नाही, हे लक्षात घेत दोन्ही संघांनी हस्तांदोलन करून पसस्परांच्या संमतीने सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात १२० षटकात ५ बाद २३९ धावा केल्या होत्या. तसेच ते ११३ धावांनी पिछाडीवर होते.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा डेवॉन कॉनवे ५९ धावांवर आणि रचिन रवींद्र २७ धावांवर खेळत होते. तसेच न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ४६ षटकात २ बाद ११९ धावा झालेल्या होत्या. तिथून पुढे न्यूझीलंडने खेळायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला रचिन आणि कॉनवे यांनी डाव सांभाळला होता. त्यांनी जवळपास १० षटके फलंदाजी केली. फण अखेर ५६ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने कॉनेवचा अडथळा दूरला. १६५ चेंडूत ६५ धावांवर खेळणाऱ्या कॉनवेचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला.

त्यानंतर ६० व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर रचिनचा अफलातून झेल केएल राहुलने घेत त्याला ३७ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे टॉम ब्लंडेल आणि डॅरिल मिटेल यांच्यावर डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. त्यांनी डाव सावरलाही होता. यादरम्यान ७४ व्या षटकात मिचेलला धावबाद करण्याची संधी आकाश दीपकडून चूक झाल्याने हुकली. पण ७६ व्या षटकात अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवत शुभमन गिलने घेतलेला DRS यशस्वी ठरला आणि ब्लंडेलला १५ धावांवर माघारी परतावे लागले. मात्र नंतर ग्लेन फिलिप्सने मिचेलला साथ दिली. या दोघांनी नंतर भारतीय गोलंदाजांना यशच मिळू दिले नाही. अखेर हा सामना अनिर्णित राहिला.

डॅरिल मिचेल १८६ चेंडूत ४९ धावांवर नाबाद राहिला, तर ग्लेन फिलिप्स १२६ चेंडूत २६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम चौथ्याच दिवशी शून्यावर बाद झाला होता, तर हेन्री निकोल्स ३१ धावांवर बाद झाला होता.

या डावात भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, अंशुल कंबोज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...