IND vs ZIM: फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजही चमकले, टीम इंडियाची दुसऱ्या T20I मध्ये दणदणीत विजयासह मालिकेत बरोबरी

India vs Zimbabwe, 2nd T20I: झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे.
Team India
Team IndiaX/BCCI

India vs Zimbabwe, 2nd T20I: झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (७ जुलै) हरारेला पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८.४ षटकात १३४ धावांवरच सर्वबाद झाला.

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक धावांनी विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारताने ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियानेही झिम्बाब्वेविरुद्ध १०० धावांनी विजय मिळवला होता.

Team India
ZIM vs IND 1st T20I : युवराजच्या लाडक्याचा पहिल्याच सामन्यात भोपळा; जगज्जेतेपदानंतर पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव

विक्रमी २३४ धावांच्या लक्ष्याचा झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी पहिल्याच षटकात सलामीवीर इनोसंट कैयाची ४ धावांवर विकेट गमावली. परंतु, नंतर विझली मधवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

परंतु, बेनेट २६ धावांवर बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेचा डाव कोसळला. त्यांनी ७६ धावांवर तब्बल ७ विकेट्स गमावल्या. तरी एका बाजूने मधवेरेने डाव सांभाळला होता. त्याला नंतर ल्युक जोंगवेने साथ दिली होती. परंतु, मधवेरेला ४३ धावांवर रवी बिश्नोईने त्रिफळाचीत केले.

त्यानंतर ब्लेसिंग मुझराबनीही २ धावांवरच बाद झाला, तर अखेरची विकेट जोंगवेच्या रुपात गेली. जोंगवेने २६ चेंडूत ३३ धावांची खेळी केली.

भारताकडून आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोईने २ विकेट घेतल्या आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.

Team India
IND vs ZIM, T20I: एकदिवस आधी शुन्यावर आऊट झालेल्या अभिषेकचा दुसऱ्याच दिवशी शतकी धमाका, दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

तत्पुर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने २ धावांवरच विकेट गमावल्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरताना १३७ धावांची भागीदारी केली.

यादरम्यान, अभिषेकने शतकही पूर्ण केले. मात्र, शतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने ४७ चेंडूत १०० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर रिंकु सिंगने ऋतुराजची चांगली साथ दिली. त्यांच्यात ८७ धावांची नाबाद भागीदारी झाली. त्यामुळे भारताने २० षटकात २ बाद २३४ धावा केल्या होत्या.

ऋतुराज ४७ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ७७ धावांवर नाबाद राहिला. तसेच रिंकूने २२ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि वेलिंग्टन मसकद्झा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com