
श्रीलंकेत सध्या श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघांची तिरंगी वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत भारताचा दुसरा सामना मंगळवारी (२९ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला.
या रोमांचक सामन्यात भारताने १५ धावांनी विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. या मालिकेतील भारताचा हा दुसरा विजय होता. याआधी भारताने श्रीलंकेला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयात प्रतिका रावल आणि स्नेह राणा यांचा मोलाचा वाटा राहिला.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ ४९.२ षटकात २६१ धावांवर सर्वबाद झाला. ताझमिन ब्रिट्झचे शतक मात्र व्यर्थ ठरले.