KL Rahul gets emotional ahead of IND vs ENG 1st Test : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरुवात होत आहे. रोहित शर्मा व विराट कोहली या दोन दिग्गजांनी कसोटी मालिकेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतरची ही भारताची पहिलीच कसोटी मालिका आहे. पण, या दौऱ्यावर या दोन दिग्गजांची उपस्थिती नक्कीच जाणवेल. भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल ( KL RAHUL) ने सामन्यापूर्वी विराट व रोहित यांच्या निवृत्तीच्या परिणामांवर चर्चा केली.
३६ वर्षीय विराट कोहलीने १२३ सामन्यांमध्ये ९,२३० धावा करून आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला. "विराट आणि रोहित गेल्या दशकभरापासून भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांची कमतरता ही खूप मोठी उणीव असेल. माझ्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत, मी कधीही विराट किंवा रोहित शिवाय खेळलेलो नाही. मी खेळलेल्या ५० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये विराट किंवा रोहित किंवा ते दोघेही तिथे होते. आता ते नाहीत आणि ड्रेसिंग रूममध्ये जाणे थोडे विचित्र वाटते. पण, तुम्हाला त्यांच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. त्यांनी देशासाठी सर्वकाही दिले आहे आणि ते भारतीय क्रिकेटचे दिग्गज राहतील. पण आता आपल्यापैकी बाकीच्यांनी पुढे येण्याची वेळ आली आहे," असे राहुलने दिल्ली कॅपिटल्स मीडिया टीमला सांगितले.