
मुंबई: आजही तो दिवस चांगला आठवतोय.. तेव्हा व्हॉट्सअपचं अस्तित्व नव्हतं, मोबाईलही एवढे ‘स्मार्ट’ नव्हते. बऱ्याच क्रीडा पत्रकारांकडे साधे फोन होते.. त्यावेळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली.. मुंबईच्या आझाद मैदानावर १४ वर्षांचा ‘पोरगा दे दना दन’ फलंदाजी करतोय... मुंबईतील सर्वात जुनी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा हॅरिस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्ड करून खेळणारा युवा फलंदाज विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. काहीतरी चमत्कारिक घडत होतं, रिझवी संघाचे राजू पाठक सर वर्तमानपत्रांच्या कार्यालयात फोन करून ही बातमी देत होते... चॅनेलवाल्यांना ती खेळी कव्हर करायला विनंती करत होते. क्रीडा पत्रकारांना धडाधड फोन गेले आणि सारे आझाद मैदानावर जमा झाले...