
PAK vs BAN Champions Trophy 2025: यजमान पाकिस्तानचा क्रिकेट संघ आज (ता. २७) होत असलेल्या चॅम्पियन्स करंडकातील अ गटामधील साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत अस्तित्व राखण्यासाठी मैदानात उतरेल. पाकिस्तानी संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता मोहम्मद रिझवानचा पाकिस्तानी संघ बांगलादेशविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करील.
पाकिस्तानात तब्बल २९ वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे; मात्र मायदेशात स्पर्धा खेळवण्यात येत असली तरी पाकिस्तानी संघाला ठसा उमटवता आलेला नाही. सलामीच्या लढतीत न्यूझीलंड संघाकडून अन् त्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान व बांगलादेश या दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाक संघातील फलंदाज ३५व्या षटकांपर्यंत संथ फलंदाजी करीत असल्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जात नाही.