Rahul Dravid : विश्‍वविजेत्या संघाच्या माजी प्रशिक्षकांनी उलगडले यशाचे रहस्य

Rahul Dravid Meet PM Narendra Modi
Rahul Dravid Meet PM Narendra Modi esakal

Rahul Dravid : मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत दुसऱ्यांदा टी-२० विश्‍वकरंडक पटकावला. शनिवारी बीसीसीआयकडून करार संपुष्टात आलेले माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ बीसीसीआयकडून पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये राहुल द्रविड यांनी यशाचे रहस्य उलगडताना म्हटले की, मला संघामध्ये जास्त बदल करायला आवडत नाहीत. त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. संघातील वातावरणावरही फरक पडतो. सुरक्षित वातावरणाला मी प्राधान्य देतो. त्यामुळे अपयशाची भीती दूर होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असतो.

राहुल द्रविड पुढे म्हणाले, मुख्य प्रशिक्षक म्हणून सुरुवातीचा काळ खडतर ठरला. काही खेळाडूंना दुखापती झाल्या. क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळाडूंचे वर्कलोड सांभाळण्याचे आव्हान होते. पहिल्या आठ ते दहा महिन्यांत पाच ते सहा कर्णधारांसोबत काम करावे लागले. याची मी कल्पनाही केली नव्हती. हे आपसूकच होत होते.

युवा खेळाडूंना संधी

कोरोनाचा काळ संपल्यानंतर भारतीय संघ जास्त प्रमाणात क्रिकेट खेळला. भारताचे दोन संघ एकाच वेळी खेळतानाही दिसले. गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यात आली. या दरम्यान काही युवा खेळाडूंचा खेळ बहरला; तर काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे संधी मिळाली, असे राहुल द्रविड आवर्जून सांगतात.

रोहित, विराटचे कौतुक

राहुल द्रविड यांनी याप्रसंगी रोहित शर्मा व विराट कोहली या दोन्ही अनुभवी खेळाडूंचे कौतुक केले. राहुल द्रविड म्हणतात, रोहित शर्मा याला युवा खेळाडू असल्यापासून ओळखतो. एक माणूस व एक कर्णधार म्हणून तो कसा मोठा झाला हे मी बघितले होते. त्याच्यासोबत काम करताना आनंद मिळाला. संघासाठीचे त्याचे समर्पण वाखाणण्याजोगे होते. खेळाडूंसाठी तो सुरक्षित वातावरण ठेवायचा. याची मला आठवण येत राहील. विराट कोहलीचा व्यावसायिकपणा भावला. खेळाडू म्हणून पुढे जाण्याची जिद्द आवडली.

प्रक्रिया महत्त्वाची

खेळामध्ये विजयाला महत्त्व आहे, पण मी कर्णधाराच्या दृष्टीला प्राधान्य देतो. प्रकियेकडे लक्ष देतो. त्यासाठी माझ्या काही बाबी निश्‍चित केल्या होत्या. खेळाडूंसाठी आव्हानात्मक परिस्थिती देऊ शकतो का? खेळाडूंकडून सराव करवून घेत आहोत का? तांत्रिकदृष्ट्या आपण सज्ज आहोत का? खेळाडूंना आपल्याकडून सहकार्य मिळते आहे का? आपण योग्य वातावरण निर्माण करीत आहोत का? विजयाआधी या सर्व बाबींची पूर्तता झाली का याकडे कटाक्ष टाकतो, असे राहुल द्रविड सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com