
शेष भारत-पंजाब यांच्यामध्ये मोहाली येथे ९ ते १२ मार्च यादरम्यान चारदिवसीय लढत पार पडणार आहे. या लढतीसाठी ज्युनियर क्रिकेट समितीने शेष भारत संघाची निवड शुक्रवारी केली. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन आणि मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे.
मुंबई संघातील आयुष वर्तक, वेदांत मूरकर, हिमांशू सिंग व प्रग्नेश कानपिल्लेवार या चार खेळाडूंना शेष भारताच्या संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच हर्षल काटे व विकी ओस्तवाल या महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. समीर रिझवी याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सी. के. नायडू करंडक पंजाब संघाने पटकावला. त्यानंतर आता पंजाब व शेष भारत यांच्यामध्ये लढत होत आहे.