
- नितीन मुजुमदार
"Do I like being no one? Absolutely. Who does not?" द .आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डेल स्टेनचे हे जुने अवतरण मला येथे उद्धृत करावेसे वाटत आहे. त्याच्या देशवासीयांनी अखेर अनेक वर्षांच्या चढ-उतारानंतर जागतिक नंबर वनचा किताब अर्थातच टेस्ट चॅम्पियनशिप मिळवून प्राप्त केला आहे. पूर्वाश्रमीच्या ' चोकर्स 'साठी मनापासून थ्री चिअर्स म्हणण्याची वेळ आली आहे!!
नव्वदच्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ किमान एका तरी फॉरमॅटमध्ये आपल्या नशिबात क्रिकेट वर्ल्ड कप यावा म्हणून या संघाची वणवण सुरू होती ती आता थांबली.
जागतिक स्तरावर यांच्या चित्रपटावर समीक्षकांनी आणि रसिकांनी मान्यतेची मोहोर उमटवून देखील नशिबात एकही ऑस्कर सोहळा नाही असाच काहीसा प्रकार होता हा! नाही म्हणायला एक चॅम्पियन्स ट्रॉफी द. आफ्रिकेच्या बोर्ड ऑफिस शोकेसमध्ये दिसते आहे, पण तिला ' वर्ल्डकप ' चा ISO मार्क नाही!!!