
आपला मुलगा उत्तम क्रिकेटर व्हावा, अशी प्रत्येकच पालकांची इच्छा असते. मात्र सगळ्यांचेच नशीब फळफळत नाही. विदर्भाचा युवा क्रिकेटपटू दानिश मालेवारचे वडील याबाबतीत स्वतःला खूप भाग्यवान मानतात.
त्यांच्या लाडक्या लेकाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून विदर्भाला तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन’ बनवून केवळ परिवाराचीच शान वाढविली नाही, तर संपूर्ण देशात विदर्भाला नावलौकिक मिळवून दिलेला आहे.
२१ वर्षीय दानिशने नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात विदर्भ संघ संकटात असताना शतक (१५३ धावा) व त्यानंतर दुसऱ्या डावात अर्धशतक (७३ धावा) ठोकून विजयात निर्णायक भूमिका वठविली.