Cristiano Ronaldo : पोर्तुगाल संघाची मदार ख्रिस्तियानो रोनाल्डोवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

Cristiano Ronaldo : पोर्तुगाल संघाची मदार ख्रिस्तियानो रोनाल्डोवर

लिस्बन : कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पोर्तुगालच्या संघाची घोषणा करण्यात आली असून ख्रिस्तियानो रोनाल्डोवर संघाची मदार असणार आहे. रोनाल्डोबरोबरच ब्रुनो फर्नांडिस आणि आंद्रे सिल्वा या अनुक्रमे मधल्या फळीतील आणि आक्रमक फळीतील खेळाडूंचासुद्धा संघात समावेश करण्यात आला आहे. तर गोलरक्षक म्हणून रुई पॅट्रिसिओ, डिओगो कोस्टा आणि जोसे सा यांच्यावर मदार असणार आहे.

रोनाल्डोला मोठ्या स्पर्धांमध्ये खेळायला आवडते. तो या मोठ्या स्पर्धांमध्ये गोलसुद्धा करतो मात्र २०१६ मधील यूएफा युरो स्पर्धा सोडली, तर त्याला एकही करंडक देशासाठी जिंकता आलेला नाही. पोर्तुगालला या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सहजासहजी प्रवेश मिळवता आला नाही. त्यांनी पात्रता फेरीत तुर्की आणि मॅसेडोनिया यांचा पराभव करत गटात सर्बियाच्या पाठोपाठ विश्वकरंडकासाठी पात्रता मिळवली आहे. सध्या सुरू असलेल्या नेशन्स लीग अजिंक्यपद स्पर्धेमध्येही त्यांना स्वित्झर्लंड आणि स्पेनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे असले, तरी पोर्तुगालचा या विश्वकरंडकातील संघ हा त्यांचा इतिहासातील सर्वात ताकदवान आहे. जोआओ कॅन्सेलो आणि नुनो मेंडिस यांचा संघाच्या बचावफळीत समावेश करण्यात आला आहे.

मधल्या फळीत ब्रुनो फर्नांडिस व जोआ मारिओ असल्याने रोनाल्डोच्या आक्रमणाला धार येणार आहे. रोनाल्डोची ही पाचवी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा असणार आहे.

पोर्तुगालचा संघ

गोलरक्षक : डिओगो कोस्टा, रुई पॅट्रिसियो, जोसे सा.

बचावफळी : डिओगो डालोट, डॅनिलो परेरा, जोआ कॅन्सेलो, अँटोनियो सिल्वा, पेपे, रुबेन डायस, नुनो मेंडेस, राफेल गुरेरो.

मधलीफळी : विल्यम कार्व्हालो, रुबेन नेव्हस, ओटावियो मॉन्टेरो, बर्नार्डो सिल्वा, मॅथ्यूस न्युनेस, ब्रुनो फर्नांडिस, जोआओ मारियो, जोआओ पालहिन्हा, विटिन्हा.

आक्रमक फळी : आंद्रे सिल्वा, रिकार्डो होर्टा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, जोआओ फेलिक्स, राफेल लिओ, गोंसालो रामोस.