ऑस्ट्रेलियाची नाचक्की; मेलबर्न मैदानाच्या लौकीकाला पुन्हा धक्का

MCG
MCG

मेलबर्न : जगातील सर्वाधिक भव्य क्रिकेट मैदान असा लौकिक मिरविणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळपट्टी धोकादायक असल्यामुळे स्थानिक स्पर्धेतील सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होण्याचा प्रकार घडला आहे. याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 26 डिसेंबरपासून "बॉक्‍सिंग डे टेस्ट' होणार आहे. 

शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे फलंदाज शॉन मार्श आणि मार्कस स्टॉयनीस यांना व्हिक्‍टोरियाच्या गोलंदाजांचे अनेक चेंडू शरीरावर लागले. त्यामुळे ते झगडत होते. त्यामुळे खेळ अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. नंतर खेळपट्टी सामना खेळविण्यासाठी धोकादायक असल्याचा निर्वाळा देण्यात आला. चेंडू कसेही उसळत होते. त्यामुळे पंच फिलिप गिलेस्पी आणि जेफ जॉशुआ यांनी सुरुवातीला "ग्राउंड स्टाफ'ला पाचारण केले. खेळपट्टीचे रोलिंग करून घेण्यात आले. त्यानंतर खेळाडू आणि मुख्य ग्राउंड्‌समन मॅट पेज यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. अखेरीस पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. रविवारी सकाळी अर्धा तास खेळ आधी सुरू होईल. त्याआधी पंच खेळपट्टीची तपासणी करतील. 

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीबाबत निर्माण झालेली चिंता कमी करण्याचा प्रयत्न "क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने केला आहे. "क्रिकेट ऑपरेशन्स हेड' पीटर रोच यांनी सांगितले की, इतर दोन सामने सुरळीत सुरू असताना या लढतीत असे होणे निराशाजनक आहे. कसोटी सामना वेगळ्या खेळपट्टीवर होणार आहे. तेथील "बाउन्स'ची चाचणी घेण्यासाठी पेज आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोन आठवडे मिळणार आहेत. 

2017 मध्ये "खराब' ताशेरा 
"एमसीजी'वर 2017 मध्ये ऍशेस मालिकेतील बॉक्‍सिंग डे टेस्ट झाली होती. त्या वेळी नीरस खेळ होऊन कसोटी अनिर्णित राहिली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) "खराब' ताशेरा ओढला होता. 

गतवर्षी "सामान्य'च दर्जा 
गतवर्षी भारताने कांगारूंचे दोन्ही डाव संपवून विजय मिळविला होता. तेव्हा खेळपट्टी "सामान्य' (ऍव्हरेज) असल्याचाच दर्जा मिळाला होता. 

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील खेळपट्टी शक्‍य तेवढ्या सर्वोत्तम स्थितीत असावी म्हणून आम्ही ग्राउंडस्टाफच्या साथीत काम करू. चेंडू कसाही कशामुळे उसळत होता, यामागील कारणे समजून घेऊन आम्ही सरस पद्धतीने समस्येचे निराकरण करू. 
- पीटर रोच, "क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चे ऑपरेशन्स हेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com