
David Warner : डावखुरा डेव्हिड वॉर्नर उजवा झाला तरी कांगारूंचा झाला 99 धावांनी पराभव
David Warner IND vs AUS 2nd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंची फलंदाजी भारतीय फिरकीसमोर ढेपाळली. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावा करायच्या होत्या. मात्र त्यांंना 217 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडून एबॉटने 54 धावांची तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र वॉर्नरला रविचंद्रन अश्विनने बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे अश्विनची फिरकी निष्प्रभ करण्यासाठी डावखुरा डेव्हिड वॉर्नर उजव्या हाताने फलंदाजी करू लागला होता. मात्र त्याची ही डाळ अश्विनने शिजू दिली नाही.
भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने देखील चांगली सुरूवात करून दिली. त्याने दुसऱ्याच षटकात शॉर्ट आणि स्मिथला बाद केले. यानंतर वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर अश्विनने कांगारूंची मधली फळी उडवली.
त्याने वॉर्नरला 53 धावांवर, मार्नस लाबुशेनला 27 धावांवर तर जॉश इंग्लिसला 6 धावांवर बाद केले. यानंतर जडेजाने दोन धक्के दिले तर ग्रीन 19 धावा करून धावबाद झाला. यानंतर शॉन एबॉटने झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचा विजय लांबवला. अखेर शमीने हेजलवूडला 23 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजाने एबॉटलाही 54 धावांवर बाद करत कांगारूंचा डाव 217 धावात संपवला.