
Deepak Chahar Wife: दीपक चहरच्या बायकोला शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी! काय आहे प्रकरण
Deepak Chahar wife Jaya Bhardwaj : भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. वृत्तानुसार हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने त्याच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी माजी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही रक्कम डीलसाठी देण्यात आली होती, मात्र जयाने पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने तिला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
मिडिया वृत्तानुसार, दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, पारीख स्पोर्ट्स हैदराबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जया यांच्याकडून करारासाठी 10 लाख रुपये घेतले जे तिने परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची एफआयआरमध्ये नावे आहेत.
दीपक चहर यांचे कुटुंब आग्राच्या शाहगंज येथील मान सरोवर कॉलनीत राहते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. डीलनुसार 7 ऑक्टोबर 2022 रोजी जयाकडून 10 लाख रुपये घेतले होते, परंतु ते अद्याप परत केलेले नाहीत. इतकंच नाही तर वृत्तानुसार पैशांच्या मागणीसाठी शिवीगाळ तर केलीच पण जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.
दीपक चहर इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे. विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने त्याला 14 कोटी रुपयांमध्ये पुन्हा संघात समाविष्ट केले. दीपक दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता.