esakal | Pro Kabaddi 2019 : नवीनच्या खेळाने दिल्लीची "दबंग'गिरी कायम 
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Beat Jaipur 46-44

सामन्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सेकंदाला जयपूर पिंक पॅंथर्सवर लोण देत दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात गुरुवारी जयपूर पिंक पॅंथर्स संघावार 46-44 असा विजय मिळविला. 

Pro Kabaddi 2019 : नवीनच्या खेळाने दिल्लीची "दबंग'गिरी कायम 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

प्रो-कबड्डी 
बंगळूर - सामन्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सेकंदाला जयपूर पिंक पॅंथर्सवर लोण देत दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात गुरुवारी जयपूर पिंक पॅंथर्स संघावार 46-44 असा विजय मिळविला. 

सातव्या मोसमातील हा सामना सर्वाधिक गुणांचा राहिला. दिल्लीच्या नवीन कुमारच्या चढाया आणि जयपूर संघाचा भक्कम बचाव या सामन्याचे खरे आकर्षण ठरले. नवीनच्या चढाया जशा निर्णायक ठरल्याच, पण दिल्लीला अखेरच्या सेकंदात नशिबाची साथही लाभली. जयपूरच्या दीपक हुडाची पकड करण्याच्या नादात त्यांच्या एका खेळाडूकडून मध्य रेषा ओलांडली गेली होती. पण, "रिव्ह्यू' शिल्लक नसल्यामुळे जयपूरला त्या गुणावर आणि पुढे सामन्यावर पाणी सोडावे लागले. 

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला चंद्रन रणजितच्या "सुपर रेड'ने दिल्लीने जयपूरवर लोण दिला. या चढाईत चंद्रनने बोनससह चार गडी टिपताना पाच गुणांची चढाई केली. सुरवातीलाच स्वीकाराव्या लागलेल्या लोणमुळे जयपूर संघ प्रेरित झाला आणि बचावाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिआक्रमण करून दिल्लीला आव्हान देण्यास सुरवात केली. पूर्वार्धात बोनसवर खेळणाऱ्या नवीनच्या पकडी देखील झाल्या. दिल्लीची ही दुखरी नस ओळखून पुढे जयपूरने नवीनला लक्ष्य करत दिल्लीवर दडपण वाढवले आणि 0-6 अशा पिछाडीनंतर एकवेळ आघाडी मिळवली. यानंतरही त्यांना विश्रांतीला 19-21 असे पिछाडीवर रहावे लागले. 

उत्तरार्धाला खेळ सुरू झाल्यावर देखील जयपूरच्या बचावपटूंनी आपला पवित्रा अधिक आक्रमक केला आणि दिल्लीच्या चढाईपटूंची कोंडी करत सतत एक पाऊल पुढे राखले. पिछाडी भरून काढताना त्यांनी मिळवलेली आघाडी दिल्लीला सलत होती. बचावपटूंकडून मिळत नसलेली साथ त्यांची डोकेदुखी ठरली. या दडपणातही नवीन कुमारने आपल्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवत तुफानी चढाया करत गुणांवर गुण मिळविण्याचा सपाटा लावला. नवीनला लक्ष्य करण्याच्या नादात घाई करण्याची चूक जयूपरच्या बचावपटूंना महागात पडली. सलग दहाव्या सामन्यांत नवीनने "सुपर टेन'ची कामगिरी करताना 16 गुणांची कमाई केली. अखेरच्या सेकंदाला लोण चढवल्यावर गुणफलक 45-43 असा होता. सहा सेकंद शिल्लक होती, तेव्हा दीपक हुडाने केलेल्या चढाईत दिल्लीने पुढे येत त्याला एक गुण बहाल केला. उर्वरित तीन सेकंदाची चढाई मिळाल्यावर जयपूरने "क्रॉस' लाईनवर बचाव ठेवला. पण, नवीनने पायाचा सुरेख वापर करून कोपरारक्षकाला टिपत श्‍वास रोखून धरायला लावलेल्या सामन्यात दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बंगळूरचा विजय 
पवनकुमारच्या सातत्याने घरच्या मैदानावर बंगळूर बुल्सचे यश कायम राहिला. त्याचवेळी प्रदीप नरवालच्या झंझावातानंतरही यंदाच्या मोसमातील पाटणा पायरेटंस संघाचे अपयश कायम राहिले. बंगळूरने 40-39 असा एका गुणाने विजय मिळविला. पवनने 17 गुण नोंदवले, तर बचावात महेंद्र सिंगचे पाच गुण निर्णायक ठरले. पाटणाकडून प्रदीप नरवाल (14 गुण), महंमह नबीबक्ष (6 गुण) आणि हादी ऑशत्रोक (5 गुण) यांचे प्रयत्न अपुरे ठरले. चढाईतील बंगळूरचे 24-21 वर्चस्वच त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

loading image
go to top