IPL 2019 : रबाडाची सुपर्ब ओव्हर; दिल्लीची केकेआरवर मात

ipl
ipl

नवी दिल्ली : आयपीएलच्या 12व्या पर्वातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाने केकेआरला निरुत्तर करीत दिल्ली कॅपीटल्सला विजय मिळवून दिला. त्याआधी निर्धारीत सामन्यात पृथ्वी शॉ याच्या 99 धावांच्या खेळीनंतरही दिल्लीला कुलदीप यादवने जखडून ठेवले. त्यामुळे टाय झाली होती. 

केकेआरकडून वेगवान गोलंदाज एम. प्रसिद कृष्णाने सुपर ओव्हर टाकली. त्यात दहा धावा गेल्या. पहिल्या चेंडूवर पंतने एकेरी धाव घेतली. दुसरा चेंडू सीमापार केल्यानंतर अय्यर तिसऱ्या चेंडूवर सीमारेषेनजिक पियुष चावलाकडून टिपला गेला. पंतने शेवटच्या तीन चेंडूंवर 2-2-1 अशा पाच धावा काढल्या. पृथ्वी शॉ याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. 

केकेआरसमोर 11 धावांचे आव्हान होते. दिल्लीने कागिसो रबाडाला पाचारण केले. पहिलाच चेंडू रसेलने सीमापार केला. मग यॉर्करवर रसेल निरुत्तर झाला, तर तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडाला. चौथ्या चेंडूवर उथप्पा, पाचव्या चेंडूवर कार्तिक, तर सहाव्या चेंडूवर उथप्पा फक्त एक धाव काढू शकले. यामुळे केकेआरला सातच धावा काढता आल्या.

तत्पूर्वी, शेवटच्या षटकात केवळ सहा धावा हव्या असताना कुलदीप गोलंदाजीला आला. पहिल्या चार चेंडूंवर चार धावा गेल्या होत्या. पाचव्या चेंडूवर विहारी डीप मिडविकेटला गिलकडून टिपला गेला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना कॉलीन इंग्राम एक धाव काढून दुसरी घेताना धावचीत झाला. यात उथप्पाची चपळाई आणि कार्तिकची दक्षता निर्णायक ठरली. 

186 धावांच्या आव्हानासमोर दिल्लीचा सलामीवीर धवन वेगवान सुरवात करून चावलाच्या चेंडूवर चकला. त्यानंतर पृथ्वीने मुंबईकर सहकारी व कर्णधार अय्यरसह 89 धावांची भागीदारी 54 चेंडूंत केली. रसेलने अय्यरला बाद करून ही जोडी फोडली. 12व्या षटकात रसेलला सलग दोन चौकार मारल्यावर अय्यर शेवटच्या चेंडूवर बाद झाला. चौथ्या चेंडूवर शुबमन गिलने डीप मिडविकेटला त्याचा सोपा झेल सोडला होता. अखेरीस त्यानेच भरपाई केली. या जोडीने भारतीय स्पिनर कुलदीपलाही 11व्या षटकात 20 धावांचे मोल देण्यास भाग पाडले होते. त्यात पृथ्वीचा षटकार-चौकार, तर अय्यरने षटकार मारला होता. 

तत्पूर्वी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून केकेआरला फलंदाजी दिली. केकेआरची 9.1 षटकांत 5 बाद 61 अशी दुरवस्था झाली होती. महाराष्ट्राच्या निखिल नाईकला सलामीस मिळालेल्या संधीचा फायदा उठविता आला नाही. याआधी दमदार फलंदाजी केलेला नितीश राणासुद्धा जेमतेम खाते उघडू शकला. अशा वेळी कर्णधार दिनेश कार्तिक व अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी सहाव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी 54 चेंडूंत केली. रसेलने चार चौकारांच्या जोडीला अर्धा डझन षटकार खेचले. त्याचा स्ट्राईक रेट 221.42 होता. हर्षल पटेलने टाकलेल्या 16व्या षटकात 20 धावा गेल्या. त्यात रसेलच्या दोन षटकारांसह कार्तिकच्या एका चौकाराचा समावेश होता. त्याआधी 12व्या षटकात या जोडीने अशाच पद्धतीने लमीच्छानेकडून 17 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळेच केकेआरला संघर्षपूर्ण धावसंख्या उभारता आली. 

संक्षिप्त धावफलक :
केकेआर : 20 षटकांत 8 बाद 185 (निखिल नाईक 7-16 चेंडू, 1 चौकार, ख्रिस लीन 20-18 चेंडू, 3 चौकार, रॉबीन उथप्पा 11, नितीश राणा 1, दिनेश कार्तिक 50-36 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, शुबमन गील 4, आंद्रे रसेल 62-28 चेंडू, 4 चौकार, 6 षटकार, कागिसो रबाडा 4-0-41-1, संदीप लमीच्छाने 4-0-29-1, हर्षल पटेल 4-0-40-2, अमित मिश्रा 4-0-36-1) टाय विरुद्ध दिल्ली

कॅपिटल्स : 20 षटकांत 6 बाद 185 (पृथ्वी शॉ 99-55 चेंडू, 12 चौकार, 3 षटकार; शिखर धवन 16-8 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार; श्रेयस अय्यर 43-32 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार; पंत 11, इंग्राम 10, विहारी 2, प्रसिद कृष्णा 4-0-33-0, लॉकी फर्ग्युसन 4-0-38-1, चावला 4-0-36-1, रसेल 3-0-28-1, कुलदीप 4-0-41-2) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com