IPL 2019 : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर विजय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला. 

हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला. 

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास सुरवात केली. पण, त्यांचा नाट्यमय पद्धतीने गडगडला आणि 116 धावांतच आटोपला. 

आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी हैदराबादला धमाल सुरवात करून दिली. आयपीएल गाजविणाऱ्या विंडीजच्या आणखी एका खेळाडूने कमाल केली. या वेळी गोलंदाज किमो पॉल चमकला. त्याने पहिल्या हप्त्यात बेअरस्टॉ आणि केन विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर रिकी भुईला बाद केले. वॉर्नर एकबाजू धरून होता. हैदराबाद संघ एक वेळेस 2 बाद 102 असे सुस्थितीत होते. त्यानंतर अवघ्या 15 चेंडूंत हैदराबादचे उर्वरित आठ फलंदाज 14 धावांत बाद झाले. सतराव्या षटकांत रबाडाने लागोपाठच्या चेंडूवर वॉर्नर आणि विजय शंकरला बाद केले. त्यानंतर अठराव्या षटकांत ख्रिस मॉरिसने एकाच षटकांतचार चेंडूत तीन फलंदाज बाद केले. हे दणके कमी पडले म्हणून रबाडाने 19 व्या षटकांत पुन्हा एकदा लागोपाठच्या चेंडूवर भुवनेश्‍वर आणि खलिल अहमद यांना बाद करून दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

कॉलिन मुन्‍रो आणि श्रेयस अय्यरने मोक्‍याच्यावेळी आक्रमण केल्याने दिल्ली कॅपिटल्सला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध दीडशेचा टप्पा पार करता आला. 

पहिलीच आयपीएल लढत खेळणाऱ्या खलील अहमदने तिघांना बाद केले, तर भुवनेश्‍वर कुमारने लौकिकास साजेसा असा तिखट मारा केला. पण, हे दोघे गोलंदाजीवरून दूर झाल्यावर मुन्रो आणि अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. पृथ्वी शॉ उसळत्या चेंडूवर बाद होत असताना त्याचा मुंबईतील सहकारी अय्यर आणि पंतची जोडी छान जमली. त्या वेळी दिल्ली पावणेदोनशे नजिक मजल मारणार असे वाटत होते; पण पुन्हा दोघेही खराब फटका मारून बाद झाले. दोघे चार चेंडूत परतले आणि अक्षर पटेल सोडल्यास दिल्लीच्या तळाच्या फलंदाजांना वर्चस्व राखताच आले नाही. 

संक्षिप्त धावफलक - दिल्ली कॅपिटल्स ः 7 बाद 155 (कॉलिन मुन्‍रो 40 - 24 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार, श्रेयस अय्यर 45 - 40 चेंडूत 5 चौकार, रिषभ पंत 23, अक्षर पटेल नाबाद 14, भुवनेश्‍वर कुमार2-33, खलील अहमद 3-30) वि.वि. सनरायजर्स हैदराबा 18.5 षटकांत सर्वबाद 116 (डेव्हिड वॉर्नर 51 -47 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, जॉनी बेअरस्टॉ 41 -31 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, रबाजडा 4-22, मॉरिस 3-22, किमो पॉल 3-17)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi capitals won match against Surizers Hyderabad