Diana Edulji : भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी दांडकंच हातात घेतलं पाहिजे... माजी क्रिकेटपटू भडकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diana Edulji India Women Cricket Team

Diana Edulji : भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी दांडकंच हातात घेतलं पाहिजे... माजी क्रिकेटपटू भडकली

Diana Edulji India Women Cricket Team : भारतीय महिला संघ टी 20 वर्ल्डकपमधील सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 5 धावांनी पराभूत झाला. यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर भारतीय महिला संघातील माजी खेळाडूंनी सडकून टीका करण्यास सुरूवात केली. भारताच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी यांनी देखील संघाला चांगलेच धारेवर धरले.

एडुल्जी यांनी तर हरमनप्रीत कौर आणि तिच्या साथीदारांना कडक शब्दात सुनावले. भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 173 धावांचे आव्हान पार करताना 167 धावांपर्यंत मजल मारली. मात्र भारताने पहिल्या डावात ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. तसेच भारतीय संघातील खेळाडू मैदानावर फिट दिसत नव्हते. हाच मुद्दा घेत एडुल्जी यांनी बीसीसीआयने आता महिला क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत कडक पावलं उचलावीत अशी मागणी केली.

डायना एडुल्जी पीटीआयशी बोलताना म्हणाल्या की, 'मला वरिष्ठ संघापेक्षा 19 वर्षाखालील मुली अधिक फिट वाटल्या. त्यामुळे त्या फानलमध्ये ढेपाळल्या नाहीत. महिलांचा वरिष्ठ संघ 2017 ते 2023 आपण तोच कित्ता गिरवत आहे.'

त्या पुढे म्हणाल्या 'बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसबाबत गांभिऱ्याने अवलोकन केले पाहिजे. मला माहिती आहे की यो-यो टेस्ट ही महिलांसाठी खूप कठिण आहे. 15 ते 12 खेळाडू ही चाचणी फेलच होतील. मात्र तुम्हाला वेगळे निकष लावले पाहिजेत. सध्या तरी फिटनेसबाबत कोणतीच जबाबदारी निश्चित होत नाहीये.'

महिला क्रिकेटपटू टी 20 वर्ल्डकपमध्ये कुठे कमी पडल्या याबाबत बोलताना एडुल्जी म्हणाल्या की, 'तुम्ही वर्ल्डकपमध्ये काय चुकलं याची संपूर्ण चौकशी करा. संघाला फिटनेसवर पहिल्यांदा काम करायला हवे. फिल्डिंग, कॅचेस, रनिंग बिटवीन द विकेट्स या गोष्टी सुधारायला हव्यात. तुमचे पाय तगडे होत नाहीत तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत.

डायना पुढे असं ही म्हणाल्या की, 'त्यांच्यासाठी बीसीसीआयने आता दांडकंच हातात घेतलं पाहिजे. त्याशिवाय त्या अव्वल स्थानावर पोहचणार नाहीत. बीसीसीआयकडून तुम्हाला सर्व काही मिळत आहे. तुम्ही नेहमी जिंकलेला सामना हरता. आता ही सवय होत चालली आहे. बीसीसीआयने आता कडक निर्णय घेतले पाहिजेत. आता त्यांचे लाड पुरवले जाऊ नयेत.'

(Sports Latest News)