
Virat Kohli: 'दोन फायनल खेळलो पण...', विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा
Virat Kohli : कर्णधार म्हणून विराट कोहलीने टीम इंडियाला परदेशात मोठे यश मिळवून दिले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. मात्र आयसीसी ट्रॉफी न जिंकल्याने त्याच्यावर टीकाही झाली होती. गेल्या वर्षी त्याने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर रोहित शर्माकडे संघाची कमान आली.
विराट कोहलीने आता त्याच्या कर्णधारपदाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार कोहली म्हणाला की, एक कर्णधार म्हणून त्याने संघाला 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये नेले, तरीही त्याची गणना अयशस्वी कर्णधार म्हणून केली जाते.
आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला, माझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तसेच 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला. तरीही मला अपयशी कर्णधार मानले जात होते. स्पर्धा वेळोवेळी होत राहतात, पण संघाची संस्कृती दीर्घकाळ टिकून राहते. अशी संस्कृती संघात रुजवण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
एक खेळाडू म्हणून मी एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यामुळे मी जे काही साध्य केले त्यात मी आनंदी आहे. कोहली 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता. एमएस धोनीने दोन्ही स्पर्धांचे नेतृत्व केले.
विराट कोहली पुढे म्हणाला, 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्या 2 कसोटीत पराभव झाल्यानंतर संपूर्ण संघ निराश झाला होता. तिसरा कसोटी सामना पर्थ येथे होणार होता. तिथली खेळपट्टी खूप अवघड मानली जाते. अशा परिस्थितीत कदाचित आमच्यासाठी इथे संधीच नव्हती. त्यावेळी माझी वनडेत 8 शतके होती. अशा परिस्थितीत मी काहीतरी करू शकतो, असा विचार मनात आला. मी पहिल्या डावात 48 आणि दुसऱ्या डावात 75 धावा केल्या. मी हे करू शकलो कारण माझा स्वतःवर विश्वास होता. ती माझी महत्त्वाची खेळी होती.