भारताच्या दिव्याला रौप्यपदक 

दिनेश गुंड 
शुक्रवार, 20 जुलै 2018

कुमार गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने तिसऱ्या दिवशी मुलींच्या गटात 1 रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी तीन गुणांची कमाई केली. मुलींच्या गटात वर्चस्व जपानचेच राहिले. त्यांनी तीन सुवर्णपदके मिळविली. भारताची दिव्या 68 किलो वजनी गटात रौप्य, तर रिना (55 किलो) आणि करुणा पाटील (76 किलो) ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या. 

नवी दिल्ली-  कुमार गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने तिसऱ्या दिवशी मुलींच्या गटात 1 रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी तीन गुणांची कमाई केली. मुलींच्या गटात वर्चस्व जपानचेच राहिले. त्यांनी तीन सुवर्णपदके मिळविली. भारताची दिव्या 68 किलो वजनी गटात रौप्य, तर रिना (55 किलो) आणि करुणा पाटील (76 किलो) ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या. 

दिव्याला चांगली कामगिरी केल्यानंतरही 68 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत तिला किर्गिझस्तानच्या मीरीमचा प्रतिकार परतवणे कठीण गेले. पहिल्या फेरीतच मीरीम हिने जबरदस्त आक्रमक आणि वेगवान कुस्ती केली. प्रथम ताबा मिळविल्याचे आणि नंतर भारंदाज डावावर असे लागोपाठ प्रत्येकी दोन गुण मिळविले. त्यानंतर दिव्या झोनबाहेर गेल्याने मीरीमला आयताच 1 गुण मिळाला आणि पहिल्या फेरीअखेरीसच तिने 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत तिने तसाच खेळ करत आणखी 5 गुणांची कमाई करत 10 गुणांच्या फरकाने विजय मिळविला. 

रिनाने 55 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत जीयांग हिच्याकडून 8-6 असा पराभव पत्करावा लागल्यावर तिला रिपेचेजमधून ब्रॉंझपदकाची संधी मिळाली. या लढतीत तिने उझबेकिस्तानच्या नजीमोवा हिच्यावर 8-2 असा एकतर्फी विजय मिळविला. सुरवातीपासून आक्रमक कुस्ती खेळताना तिने भारंदाज डावाचा सुरेख वापर करून पहिल्या फेरीत 4-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत नजोमोवा हिने दोन गुण घेत रिनाला आव्हान दिले. रिनाने संयम राखून चपळाई दाखवत प्रथम एका गुणाची कमाई केली. त्यानंतर नजोमोवा झोनबाहेर गेल्याने तिला एक गुण मिळाला. अखेरच्या टप्प्यात दुहेरी पट काढून रिनाने दोन गुणांची कमाई करताना विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी तिने पहिल्या फेरीत तैवानच्या ची चॉंग आणि कझाकिस्तानच्या ऐझानवर मात केली. नॉर्डिक पद्धतीने झालेल्या 76 किलो वजनी गटात करुणा पाटील ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. पहिल्या लढतीत ती किर्गिझस्तानच्या आयपेरीकडून पराभूत झाली. पण, दुसऱ्या लढतीत तिने कझाकिस्तानच्या अविरोवा हिला पराभूत केले. क्रॉस उपांत्य फेरीत ती चीनच्या युझेनकडून पराभूत झाली. पण, मंगोलियाच्या पटलुली हिच्याविरुद्ध आक्रमक आणि वेगवान कुस्ती खेळत तिने 10 गुण मिळवून तांत्रिक गुणांवर विजय मिळविला. 

शिवानीला ब्रॉंझपदकाची संधी होती. मात्र, 50 किलो वजनी गटात ती ब्रॉंझपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या मरिनाकडून चीतपट झाली. त्यापूर्वी तिने उझबेकिस्तानच्या अकलेंज, तैवानच्या हुसेन हसी यांच्यावर विजय मिळविला. उपांत्य फेरीत तिला चीनच्या युमेल झॉंगकडून पराभूत व्हावे लागले.

Web Title: Divya wins silver, bronze for Karuna and Reena at Junior Asian wrestling