esakal | 'गोव्यातील आयोजनाबाबत चिंता नको'
sakal

बोलून बातमी शोधा

'गोव्यातील आयोजनाबाबत चिंता नको'

'गोव्यातील आयोजनाबाबत चिंता नको'

sakal_logo
By
पीटीआय

पणजी - भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे गोवा हे एक केंद्र आहे. या ठिकाणचे आयोजन आणि सुविधांबाबत ‘फिफा’ने चिंता अजिबात करू नये, पूर्ण सहकार्य कायम राहील, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी तयारीची पाहणी करण्यास आलेल्या शिष्टमंडळास दिले. तज्ज्ञांनी गोव्यातील तयारीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

‘फिफा’च्या स्पर्धा समितीचे प्रमुख जेमी यार्झा यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आहे. बुधवारी त्यांनी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी केली होती. गुरुवारी शिष्टमंडळ गोव्यात दाखल झाले. त्यांनी फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, तसेच सराव मैदानांची पाहणी केली. हे शिष्टमंडळ गोव्यानंतर कोची, नवी मुंबई, गुवाहाटी व कोलकता या शहरांना भेट देईल. १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धा येत्या सहा ते २८ ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे.

‘‘फुटबॉलसाठी गोवा प्रसिद्ध आहे. येथील फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे. तयारीसंदर्भात तक्रारीस कोणतीच जागा नसेल. विश्‍वकरंडक स्पर्धा ही गोव्यासाठी मोठी संधी आहे,’’ असे पर्रीकर यांनी यार्झा यांना सांगितले. यापूर्वी पर्रीकर राज्याचे मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये गोव्यात लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले होते. तेव्हा साधनसुविधांची विक्रमी वेळेत उभारणी झाली होती. फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मालकीचे आहे.

शिष्टमंडळ समाधानी
‘फिफा’ने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी गोव्याला केंद्र म्हणून गेल्या वर्षी २२ ऑक्‍टोबरला मान्यता दिली होती. त्यानंतर आता अंतिम पाहणीसाठी शिष्टमंडळ गोव्यात आले आहे. ‘फिफा’च्या शिष्टमंडळातील तज्ज्ञांनी तयारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ‘‘वर्षभरात स्टेडियमला प्राप्त झालेली झळाळी सुखावणारी आहे. संबंधितांनी खूप चांगले काम केले आहे. मुख्यमंत्र्याशी भेट घेतली व चर्चा सकारात्मक ठरली,’’ अशी असे यार्झा यांनी पाहणी प्रक्रियेनंतर सांगितले. 

loading image
go to top