Eng vs Ban T20I : बांगलादेशने रचला इतिहास! विश्वविजेत्या इंग्लंडला प्रथमच चारली पराभवाची धूळ अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eng vs ban 2nd t20i bangladesh-won-the-t20-series-against-world-champions-england

Eng vs Ban T20I : बांगलादेशने रचला इतिहास! विश्वविजेत्या इंग्लंडला प्रथमच चारली पराभवाची धूळ अन्...

England vs Bangladesh T20I : मेहदी हसन मिराजची उत्कृष्ट गोलंदाजी आणि नजमुल हुसेन शांतोच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

बांगलादेशचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिलाच द्विपक्षीय मालिका विजय आहे. इंग्लंडच्या 117 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने 18.5 षटकांत 6 गडी गमावून विजय मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. 16 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर वारंवार अंतराने विकेट पडत राहिल्या. पण शांतोने एक टोक धरले आणि 47 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय सॅम कुरन, मोईन अली आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 16 धावावर डेव्हिड मलानच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर थोड्या अंतराने विकेट पडण्याची मालिका सुरू झाली. इंग्लंडकडून बन डकेटने सर्वाधिक 28 धावांची खेळी खेळली. याशिवाय सलामीवीर फिलिप सॉल्टने 25 धावा केल्या. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दहाचा आकडाही गाठता आला नाही.

बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 12 धावांत 4 तर तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, कर्णधार शकीब अल हसन आणि हसम महमूद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.