ENGvsNZ : कॉन्वेनं षटकार खेचत तोऱ्यात साजरं केल द्विशतक!

Devon Conway
Devon ConwayTwitter

England vs New Zealand, 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवसही कॉन्वेनं गाजवला. मार्क वूडच्या गोलंदाजीवर षटकार खेचत पठ्ठ्यानं पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकाला गवसणी घातली. पहिल्या दिवशी त्याने शतकी खेळी करुन डाव सावरला होता. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी देखील त्याने संयमी खेळ करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. एका बाजूने विकेट पडत असताना तो मैदानात तग धरुन उभा राहिला. त्याने 347 चेंडूचा सामना करुन 200 धावा केल्या. या खेळीत त्याने 22 चौकार आणि 1 षटकार खेचला. षटकाराने द्विशतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या रुपात न्यूझीलंडने अखेरचा गडी गमावला. दुर्देव म्हणजे तो रन आउट झाला. त्याच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 378 धावा केल्या आहेत.

Devon Conway
ENGvsNZ: दमदार पदार्पणानंतर गोलंदाजाला जुन्या चुकांनी रडवलं!

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा डेवोन कॉन्वे हा सहावा फलंदाज आहे. 1903-04 मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज रेजिनाल्ड एर्स्काईन फॉस्टर यांनी 287 धावांची खेळी केली होती. ही आतापर्यंत पदार्पणात केलेली सर्वोच्च द्विशतकी खेळी आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटर लॉरेन्स रोवे यांनी इंग्लंड विरुद्धच्या (1971-72) सामन्यात 214 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटर ब्रेंडन कुरुप्पू यांनी 1987 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 201 धावांची नाबाद खेळी केली होती. 1999 मध्ये न्यूझीलंडच्या मॅथ्यू सिन्क्लेअर यांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 214 धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेचे जॅक रुडोल्फ याने 2003 मध्ये बांगलादेश विरुद्ध 222 धावांची नाबाद खेळी केली होती.

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासह आघाडीच्या इतर फलंदाजांना नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. 3 बाद 114 धावा असताना मैदानात आलेल्या हेन्री निकोलसने अर्धशतकी खेळी करुन डेवोन कॉन्वेला उत्तम साथ दिली. त्याने 175 चेंडूचा संयमीरित्या सामना करत 61 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार खेचले. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. वॉटलिंग एक धाव करुन तंबूत परतला. ग्रँडहोम आणि सँटनरला खातेही उघडता आले नाही. जेमीनसनने 21 चेंडूत 9 धावा केल्या. साउदी 8 धावा करुन परतल्यानंतर कॉन्वेनं वॅगनरच्या साथीने 10 व्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी करत द्विशतक पूर्ण केले. द्विशतकानंतर कॉन्वे रन आउट झाला. वॅगनार 21 चेंडूत 25 धावा करुन नाबाद परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com