
ENG W vs IND W : अटितटीच्या लढतीत भारतीय महिलांनी मारली बाजी
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयासह भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत बरोबरी साधली. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लिश महिलांसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या महिला संघाला निर्धारित 20 षटकात 140 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघाने 8 धावांनी विजय नोंदवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीये. (England Women vs India Women 2nd T20I India Women won by 8 runs And Equal Series)
भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना टॅमी ब्यूमॉन्ट आणि डॅनियल वॅट यांनी इंग्लंडच्या संघाच्या डावाला सुरुवात केली. डॅनियल वॅट 3 (5) पुन्हा अपयशी ठरली. तिच्या रुपात अरुंधती रेड्डीने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. नॅटली स्कायवरच्या 1 (1) रुपात इंग्लंडने दुसरी विकेट गमावली. रिचा घोषने तिला रन आउट केले. सलामीची फलंदाज टॅमी ब्यूमॉन्ट हिने कर्णधार हिथर हिच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला.
दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचली. दिप्ती शर्माने घातक ठरत असलेल्या टॅमी ब्यूमॉन्टला 59 धावांवर बाद केले. कर्णधार हेथ नाईट हिलाही दीप्तीनेच रन आउट करत भारताला आणखी यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. एमी एलन जोन्स 11 (12) ची पूनम यादवने शिकार केली. सोफिया डंकलेच्या रुपात इंग्लंडने रन आउटच्या रुपात तिसरी विकेट फेकली.
भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 148 धावा केल्या होत्या. स्मृती आणि शफाली या जोडीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 70 धावा केल्या. मॅडी डिविलियर्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका खेण्याच्या नादात शफाली शर्मा बाद झाली. शफालने 38 चेंडूत 48 धावांची खेळी केली. ही भारतीय संघाकडून सर्वोच्च खेळी ठरली. तिच्या पाठोपाठ धावफलकावर 72 धावा असताना स्मृती मानधनाच्या रुपात भारतीय महिला संघाला दुसरा धक्का बसला. स्मृती मानधनाने 15 चेंडूत 20 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत 31 (25), रिचा घोष 8 (9) बाद झाल्यानंतर दीप्ती शर्माच्या 27 चेंडूतील नाबाद 24 धावा आणि स्नेह राणाने 5 चेंडूत केलेल्या नाबाद 8 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 148 धावा केल्या होत्या.