सायकलिंस्ट एसोला जागतिक रौप्य

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

एसो आल्बेन या गुणवान सायकलपटूने जागतिक ट्रॅक सायकलिंग स्पर्धेच्या कुमार गटात रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. कुमार सांघिकमध्ये सुवर्ण तसेच वरिष्ठ सांघिकच्या कैरिन प्रकारात ब्रॉंझ जिंकल्यावर एसोने वैयक्तिक रौप्य पटकावले.

मुंबई : एसो आल्बेन या गुणवान सायकलपटूने जागतिक ट्रॅक सायकलिंग स्पर्धेच्या कुमार गटात रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. कुमार सांघिकमध्ये सुवर्ण तसेच वरिष्ठ सांघिकच्या कैरिन प्रकारात ब्रॉंझ जिंकल्यावर एसोने वैयक्तिक रौप्य पटकावले.

पोर्ट ब्लेअरचा एसो गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांत वेगाने प्रगती करीत आहे. तो प्राथमिक फेरीत 10.225 कामगिरीसह सातवा आला होता, पण त्याने बाद फेरीत कामगिरी उंचावत वेगाने मुसंडी मारली. अंतिम फेरीत तो ग्रीसच्या कोन्सानिनो लिवानोस याच्याविरुद्ध 1-2 असा पराजित झाला. पहिली शर्यत गमावल्यावर एसोने दुसरी शर्यत जिंकली, पण निर्णायक शर्यतीत तो वेग राखू शकला नाही.

सुवर्णपदक जिंकण्याची संधी दवडली हे सलत आहे, पण भारतास जागतिक स्पर्धेत तीन पदके जिंकून देऊ शकलो याचा नक्कीच आनंद आहे, असे एसोने सांगितले. भारताचा एल रोनाल्डो सिंग पात्रतेत चौथा आला होता, पण त्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपले.

एसोने ब्रिटनचा जेम्स बंटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा जॉन ट्रोवास यांना हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता शर्यत तीन फेऱ्यांची झाली होती. एसोने पात्रतेत दुसरा आलेला ऑस्ट्रेलियाच्या सॅम गॅलाघेर याला 2-0 असे हरवले. त्याची उपांत्य लढत यजमानांच्या ज्युलियन जॅगर याच्याविरुद्ध होती. जॅगरने पहिली शर्यत जिंकली, पण एस्सोने दोन शर्यती जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eso won world cycling silver