Euro Cup 2024 : इंग्लंड पराभवाच्या खाईतून विजयपथावर; स्लोव्हाकियाविरुद्ध अतिरिक्त वेळेत गोल, झुंजार जॉर्जियावर स्पेनची मात

UEFA European Championship : इव्हान श्रान्झ याने २५व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे स्लोव्हाकियाने उपांत्यपूर्व फेरीत एक पाऊल टाकले होते.
Euro Cup 2024
Euro Cup 2024Sakal
Updated on

कलोन : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत (राऊंड ऑफ १६) गतउपविजेत्या इंग्लंडने जबरदस्त उसळी घेताना स्लोव्हाकियाविरुद्ध पराभवाच्या खाईतून अतिरिक्त वेळेत २-१ फरकाने विजयाला गवसणी घातली, तर एका गोलच्या पिछाडीवरून तीन वेळच्या माजी विजेत्या स्पेनने झुंजार जॉर्जियावर ४-१ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतील जागा पक्की केली.

गेल्झनकिर्शन येथे स्लोव्हाकियाचा संघ कमनशिबी ठरला. इव्हान श्रान्झ याने २५व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे स्लोव्हाकियाने उपांत्यपूर्व फेरीत एक पाऊल टाकले होते. भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटापर्यंत त्यांचा विजय पक्का होता,

मात्र वाढीव वेळेतील एक मिनिट बाकी असताना ९०+ पाचव्या मिनिटास २१ वर्षीय ज्युड बेलिंगहॅम याची ओव्हरहेड किक अचूक ठरली आणि इंग्लंडने १-१ बरोबरीसह सामना अतिरिक्त वेळेत नेला.

९१व्या मिनिटास सेटपिसेसवर कर्णधार हॅरी केन याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे इंग्लंडपाशी २-१ अशी आघाडी जमा झाली, जी एकूण १२० मिनिटांनंतर गतउपविजेत्यांसाठी निर्णायक ठरली. जोरदार पुनरागमन साधलेला गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडचा संघ आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्ध खेळेल.

स्पॅनिश संघाची उत्तरार्धात मुसंडी

कलोन येथे बलाढ्य स्पेनविरुद्ध यंदा युरो करंडक पदार्पण केलेल्या जॉर्जियाची सुरुवात स्वप्नवत ठरली. स्पॅनिश बचावपटू रॉबिन ले नॉर्मन याच्या स्वयंगोलमुळे १८व्या मिनिटास विली सॅन्यॉल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आघाडी मिळाली.

नंतर लुईस दे ला फ्लुएन्टे यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने जोरदार प्रतिकारासह वर्चस्व प्रस्थापित केले. ३९व्या मिनिटास सामनावीर ठरलेल्या रॉड्री याच्या डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर स्पेनने बरोबरी साधली.

उत्तरार्धातील खेळात त्यांनी आणखी तीन गोल नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत यजमान जर्मनीसमोर आव्हान उभे केले. फाबियान रुईझ याच्या शानदार हेडरमुळे स्पेनला ५१व्या मिनिटास आघाडी मिळाली, नंतर २१ वर्षीय निको विल्यम्स याने ७५व्या मिनिटास, तर बदली खेळाडू डानी ऑल्मो याने ८३व्या मिनिटास गोल करून स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आकडेवारीत राऊंड ऑफ १६ लढती...

- युरो करंडकात इंग्लंड ११ लढती अपराजित (७ विजय, ४ बरोबरी)

- इंग्लिश कर्णधार हॅरी केन याचे युरो करंडकात ६ गोल, वेन रुनी याच्याशी बरोबरी

- इंग्लंडतर्फे आता हॅरी केन याचे एकूण ६५ गोल

- स्लोव्हाकियाविरुद्ध इंग्लंड ७ सामने अपराजित (६ विजय, १ बरोबरी)

- सलग ३ लढती गोल न स्वीकारलेल्या स्पेनवर जॉर्जियाविरुद्ध पहिला गोल

- युरो बाद फेरीत गोल करणारा निको विल्यम्स (२१ वर्षे ३५४ दिवस) स्पेनचा दुसरा युवा फुटबॉलपटू, यापूर्वी फेर्रान टॉर्रेस याचा २१ वर्षे ११९ दिवसांचा असताना गोल

मला निराशेऐवजी खूप अभिमान वाटतो, कारण ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या एका अव्वल संघाविरुद्ध आम्ही खूप छान खेळलो. आमचा खेळ त्यांच्या तोडीचा होता, आम्ही त्यांना खूप कमी संधी दिली; पण कमनशिबाने अखेर अपेक्षित ठरली नाही. अतिरिक्त वेळेत आम्ही अधिकांश वेळ त्यांच्या भागात होतो. निकाल संरक्षित करण्यासाठी त्यांना बचावात जादा बचावपटू आणण्यास आम्ही भाग पाडले, याचा मला अभिमान आहे.

-फ्रान्सेस्को काल्झोना, स्लोव्हाकियाचे प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.