Shane Warne Greatness : बेधडक, बेजोड.... आणि बेमालूमही...!

Shane Warne
Shane WarneSakal Digital

लेखक - नितीन मुजुमदार

१९९३, मँचेस्टरचे (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड मैदान, अॅशेस (Ashes) मालिकेतील त्याचा पदार्पणाचा चेंडू होता. तो वाऱ्याच्या दिशेने प्रवाहपतीत होणाऱ्या त्याच्या फिक्या शुभ्र पित केसांच्या बटा, ओठांवर व नाकाच्या मधोमध लावलेले झिंक क्रीम, मानेभोवती त्याच्या सतत हालचालींमुळे त्याच्या चेंडूसारखीच सारखी उसळी घेणारी सोन्याची चेन, उलटी केलेली शर्ट कॉलर, शर्टचे पहिले बटन न लावलेले, चेहऱ्यावर वयाला शोभणारे अवखळ भाव, सहजसुंदर उत्स्फूर्त असा मैदानावरील वावर, सप्तपदी ( हो,अगदी मोजून सात पावले!) बॉलिंग स्टार्ट, समोरील बॅट्समन ७३ कसोटी खेळलेला मुरब्बी माईक गॅटींग.…. हात व खांदे यांची आकर्षक कवायत करीत चेंडू टाकला जातो, लेग स्टंपच्या बाजूला पडलेला तो चेंडू नुसतीच उसळी घेत नाही तर उंच घाटावरील रस्ता वळणावर जसा दिशा बदलतो तसा वळतो देखील! गॅटिंगला काही समजण्याच्या आत त्याचा ऑफ स्टंप इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारखा हलतो, गॅटिंगही आतून हलतो! मान हलवित पॅवेलिअनकडे प्रस्थान करतो!!

अंपायर डिकी बर्ड मनातील भाव इच्छा असूनही तितकेसे नीट व्यक्त करत नाहीत... नंतर ते या चेंडूबद्दल बोलताना एका मुलाखतीत म्हणाले, ''मी आंतरराष्ट्रीय अंपायर म्हणून काम करताना माझ्या २३ वर्षीय कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चेंडू होता, मी शेनला म्हणालो, तू या चेंडूमुळे तुझे नाव इतिहासात लिहिणार आहेस". गॅटिंग या चेंडूबद्दल २०१३ साली एका मुलाखतीत म्हणतो, "मी विकेट बऱ्यापैकी कव्हर करून पायांमागून बोल्ड होणार नाही याची काळजी घेतली होती पण हा चेंडू एवढा जबरदस्त टर्न झाला की मी पुढून बोल्ड झालो!". क्रिकेट इतिहासातील हा 'बॉल ऑफ दि सेंच्युरी' लाईव्ह बघितलेले खूप भाग्यवान! आजही हा क्षण यूट्युबवर सातत्याने बघितला जातो.

Shane Warne
Shane Warne: शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी २० मिनिटांमध्ये थायलंडमध्ये काय घडले?

बेजोड आणि बेमालूम...

हे दोन शब्द शेन वॉर्नच्या (Shane Warne) कारकीर्दीशी खूप समर्पक आहेत. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत बेजोड अशी कामगिरी केलेल्या वॉर्नला जग लक्षात ठेवेल ते त्याच्या बेमालूम लेगस्पिन/गुगलीसाठी. ५२ वर्षे या न जाण्याचा वयात तो गेला. बिल ओरेली, आर्थर मेली, क्लॅरी ग्रीमेट, सोनी रामाधीन, सुभाष गुप्ते, चंद्रा, रिची बेनॉ, अब्दुल कादिर हे सारे लेगस्पिनर्स वॉर्नचे पूर्वसुरी. यांच्यापैकी ग्रिमेट (३७ कसोटी २१६ विकेट्स) व बिल ओरेली (२७ कसोटी १४४ विकेट्स) या दोन्ही ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर्सची प्रति टेस्ट सरासरी विकेट्सची संख्या आजही सर्वोत्तम आहे. कुंबळे हा वॉर्नचा समकालीन. मात्र या साऱ्या लेगस्पिनर्समध्ये वॉर्न स्टँड आउट होतो. ब्रॅडमन नंतर गुणवत्ता व प्रसिद्धी या कारणांसाठी जग व्यापलेला वॉर्न हा कदाचित पहिलाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटर. अॅशेसमध्ये सर्वाधिक विकेट्स, ऑस्ट्रेलियातर्फे देखील सर्वाधिक कसोटी विकेट्स, कसोटी इतिहासातील द्वितीय क्रमांकाच्या एकूण विकेट्स (त्याहून अधिक विकेट्स फक्त मुरलीधरनच्या नावावर आहेत). रॉडनी मार्श पाठोपाठ शेन वॉर्न असे हे दोन दिग्गज कांगारुंनी एका पाठोपाठ गमाविले.

लेगस्पिन म्हणजे क्रिकेटमधील शिवधनुष्य!

ऑफ स्पिन ही कला त्यामानाने नैसर्गिक म्हणता येईल मात्र लेगस्पिनसाठी कैक अधिक पट मेहनत लागते आणि नुसती मेहनत नाही तर प्रचंड वरच्या दर्जाचा संयम लागतो आणि चेंडूवर हुकुमी नियंत्रण नसेल तर हे सारे व्यर्थ असते! म्हणूनच या कलेला जेवढे ग्लॅमर आहे तेवढे क्रिकेटमधील इतर कुठल्याही कौशल्याला नाही! मर्यादित षटकांच्या जमान्यात लेगस्पिनर सकृतदर्शनी मारायला सोपा वाटतो पण एकदा का तो ठराविक लयीत व्हेरिएशन करीत बॉलिंग करायला लागला की त्याला रोखणे केवळ अशक्य होते, जे वॉर्नच्या बाबतीत बहुसंख्य वेळेला होत असे. कसोटीत तर तो राजा होता. लेग स्पिन हा बॉलिंगमधील सर्वात अवघड पण तितकाच आकर्षक प्रकार!! मात्र वॉर्नने ज्या सहजतेने हा प्रकार हाताळला ती सहजता थक्क करणारी होती. एक लेगस्पिनर म्हणून त्याचे चेंडूवरील नियंत्रण अविश्वसनीय होते. भले भले लेगस्पिनर्स अनेक वेळा लाँग हॉप, शॉर्ट ऑफ गुड लेंग्थ, फुल टॉस अशा चेंडूंशी, त्यांची इच्छा नसताना मैत्री करताना दिसतात (कारण चेंडूवर नियंत्रण राखणे जमत नाही!).

Shane Warne Ball of the Centur
Shane Warne Ball of the CenturSakal

मात्र वॉर्नकडे लेगस्पिन, फ्लिपर, गुगली, फास्टर वन ही सारी अस्त्रे अचूक टप्पा, उंची व विविधतेसह भात्यात ठासून भरलेली होती. अलीकडच्या काळात तीव्र क्षमतेची 'न्युक्लीअर दर्जाची अस्त्रे' धारण करणारा व त्यामुळे फलंदाजांच्या मनसुब्यांची ठिकरे ठिकरे उडविणारा हा एकमेवअद्वितीय लेगस्पिनर होता. यात दुमत नसावे! ४५ अंश कोनातून तो सातत्याने चेंडू वळवीत असे. चेंडूला उंची द्यायला तो बिलकुल घाबरत नसे!! आक्रमकता हा त्याचा स्थायीभाव होता, जो त्याच्या बॉलिंगमध्ये कायम दिसला. या महाराजांचा टप्पा मात्र कधी चुकला नाही, ना त्याचा चेंडू कधी दिशा सोडून भरकटला!!

Shane Warne
Shane Warne: खेळाडू म्हणून 'ग्रेट' होताच पण माणूस म्हणूनही मोठाच!

लेगस्पिनच्या या 'मॉडर्न डे विझार्ड' ने गेल्या तीन दशकात या कलेला केवळ पुन्हा वाढती प्रतिष्ठाच दिली असे नव्हे तर सद्य स्थितीत आवश्यक असे थोडे जास्त असे प्रसिद्धीचे वलयही दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोजून १००१ विकेट्स, कसोटीत ७०० हुन अधिक विकेटस् घेताना प्रति विकेट फक्त २५ रन्स आणि अडीच रन्सचा इकॉनॉमी रेट अशी अभूतपूर्व आकडेवारी. दोन चार सिझन्सची एक्सपायरी डेट असलेले आयपीएल (IPL) सुपरस्टार्स हल्ली खूप दिसतात, आणि तुमची इच्छा असो अथवा नसो टेस्टस हल्ली कितीही जास्त संख्येने निकाली होत असल्या तरी टेस्ट क्रिकेट हळू हळू जनाधार गमावत आहे आणि या पार्श्वभूमीवर वॉर्नसारख्या पारंपरिक आणि आधुनिक क्रिकेट असे दोन्ही वारसे समर्थपणे पेलणाऱ्या महानायकाचे अकाली जाणे क्रिकेट जगतासाठी खूप जास्त धक्कादायक आहे. लक्षात ठेवा मर्यादित षटकांच्या क्रिकेटची 'अती आश्वासक' वाटचाल बघता या पुढील पिढ्यांना सर्व फॉरमॅटस् मध्ये अधिराज्य केलेले महानायक बघायला मिळणे दिवसेंदिवस अधिकच दुरापास्त होणार आहे. आयपीएल सारख्या फॉरमॅटमध्ये सुरुवातीला 'या फॉरमॅटसाठी कोणी लेगस्पिनर्स आवश्यक आहेत' असे म्हंटले असते तर त्याला वेड्यात काढलं गेलं असते, आज आयपीएलच्या अनेक संघात एक नाही तर दोन दोन लेगस्पिनर्स दिसतात आणि त्याचे मोठे श्रेय वॉर्न ला. अगदी सुरुवातीला म्हणजे २००८ साली आयपीएलच्या पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्सला जेतेपद मिळवून देताना शेन वॉर्नचा वाटा निसंशय मोठा होता!

Shane Warne Greatness Unmatched
Shane Warne Greatness Unmatched esakal

२००५ च्या अॅशेस मालिकेत वॉर्नने ५ कसोटीत १९.९३ च्या सरासरीने ४० विकेट्स घेतल्या, त्याच्याच संघातील ब्रेट ली (१९ विकेट्स) तर मॅकग्रा (२० विकेट्स) यांनी एकत्र देखील एवढ्या विकेट्स घेतल्या नाहीत एवढा प्रभाव वॉर्नचा त्या मालिकेवर होता. वॉर्नने पदर्पणानंतर सलग सहा अॅशेस मालिका संघाला जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला. मात्र वॉर्नच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी घटना ठरविण्यासाठी इएसपीएन क्रिकइन्फोने घेतलेल्या पोलमध्ये तब्बल ४३ टक्के रसिकांनी गॅटिंगचा बोल्ड घेणाऱ्या चेंडूला सर्वाधिक मोठी घटना मानले आहे. १९९९ च्या वर्ल्ड कपची उपांत्य फेरीतील वॉर्नची कामगिरी ही रसिकांना महत्वाची वाटते. २००५ अॅशेस मालिका, एमसीजी वर ७००वी विकेट या त्याच्या कारकीर्दीतील इतर लक्षवेधी घटना आहेत. भारतासारख्या देशातून किंबहुना आशिया खंडातून उच्च दर्जाचे स्पिनर्स येणे सवयीचे आहे पण ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून एवढ्या उच्च दर्जाचा लेग स्पिनर तोही अलीकडच्या काळात येणं ही एक खूप मोठी घटना आहे. वॉर्नने काही अपवाद वगळता सर्व देशांसमोर सर्व मैदानांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे ही बाब खूप महत्त्वाची व कौतुकास्पद आहे.

मैदानाबरोबरच वॉर्न हा मैदानाबाहेरही वेगवेगळ्या, बऱ्या वाइट कारणांसाठी खूप चर्चेत राहिला, त्याचे मैदानाबाहेरही आयुष्य खूप वादळी होते. वॉर्नच्या जाण्याने क्रिकेटमधील एका महापर्वाची अनपेक्षित अशी अखेर झाली आहे. नियतीच्या या स्पेल पुढे काल दुर्दैवी वॉर्न रिव्हर्स एन्ड ला होता, काळाचा गुगली कधीच कोणाला 'रीड' करता आलेला नाही...ना तो वॉर्नला करता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com