

Fergus Browning Wins Yellow Jersey in Pune Grand Tour Prologue
Sakal
नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात मंच उभा राहिला... ढोल-ताशांचा आवाज घुमला... ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा झाल्या अन् छतावर सायकली घेऊन कार दाखल झाल्या. सायकली छतावरून खाली आल्या आणि स्पर्धक सायकल घेऊन रॅम्पवर गेला... घड्याळात दुपारचे दीड वाजले आणि अंकाची उलटी गणती झाल्याबरोबर खेळाडू ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या प्रोलॉगच्या मार्गावर रवाना झाला. पहिल्या दिवशी मलेशियाच्या ‘तेरेंगानू सायकलिंग टीम’च्या फर्ग्युस ब्राउनिंग याने आपले वर्चस्व सिद्ध करत ‘यलो जर्सी’ पटकावली.
दुपारी ठीक दीड वाजता, भारतीय राष्ट्रीय विकास संघाचा सचिन देसाई हा शर्यतीला सुरुवात करणारा पहिला सायकलपटू ठरला. यावेळी जमलेल्या प्रेक्षकांनी ‘सचिन, सचिन...’ अशा घोषणा देऊन त्याचे मनोबल उंचावले. यात १६४ सायकलपटू प्रत्येकी एक मिनिटाच्या अंतराने वैयक्तिकरीत्या सहभागी झाले होते.
फर्ग्युस ब्राउनिंग अवघ्या आठ मिनिटे ०५.८९ सेकंदांत ७.५ किलोमीटर अंतर कापून अव्वल स्थान पटकावले. ताशी ५० किलोमीटरपेक्षा जास्त सरासरी वेगाने सायकल चालवत ब्राउनिंगने सर्वांत वेगवान वेळ नोंदवली आणि मानाची ‘यलो जर्सी’ पटकावली. मंगळवारपासून (ता. २०) सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात तो जर्सीत दिसणार आहे.