इजिप्तची ईद थोडक्‍यात हुकली स्टार सुआरेझची कोंडी, उरुग्वेचा 90 व्या मिनिटास विजयी गोल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली. 
 

येकेतेरेनबुर्ग - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली. 

जोस गिमेनेझ याच्या ताकदवान हेडरने इजिप्तच्या हार टाळण्याच्या आशा संपवल्या. कार्लोस सॅंचेझच्या अचूक फ्री किकवर गिमेनेझने हेडर करताना संधीस कायम तयार राहावे हेच दाखवले, खरं तर उरुग्वेची हुकूमत चांगलीच होती. इजिप्तने कमालीची कोंडी केल्यानंतर सुआरेझने गोलसाठी चार प्रयत्न केल्याचे समाधानच स्वतःला दिले, तर एडिसन कॅव्हिनीच्या किकवर चेंडू बारला लागून बाहेर आला. 

मोहंमद सालाहभोवतीच इजिप्त संघ फिरतो हेच दिसले. या मोसमात लिव्हरपूलकडून 44 गोल केलेल्या सालाहला विश्रांती दिल्यामुळे इजिप्तच्या आक्रमणातील धारदारपणाच कमी झाला. पण त्यानंतरही ते 1990 नंतरचा स्पर्धेतील पहिला गुण मिळवतील असे वाटत होते, पण गिमेनेझच्या गोलने सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले. उरुग्वे जिंकले असले तरी रशियाच "अ' गटात सरस गोलफरकामुळे अव्वल आहे. 

सुआरेझचा सूर हरपल्याने उरुग्वेचे आव्हान खडतर झाले. त्याच्या 99 व्या सामन्यात त्याची इजिप्तने सुरवातीस कोंडी केली. ही कोंडी यशस्वी होण्यापूर्वी तो सहा यार्डावरून चेंडू गोलजाळ्यात पाठवू शकला नव्हता, तर त्याचे दोन प्रयत्न इजिप्त गोलरक्षकाने सहज रोखले. 

लक्षवेधक 
- उरुग्वेने 1970 नंतर प्रथमच विश्‍वकरंडकातील सलामीची लढत जिंकली. 
- अर्थात त्यांना हार टाळल्याचे समाधान असेल. 
- पराभवाने इजिप्तची वाटचाल खडतर होणार. 
- इजिप्त चाहत्यांची सामन्यापूर्वी येकेतेरनबुर्ग परिसरातील एकमेव मशिदीत गर्दी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIFA World Cup 2018 Uruguay beat Egypt 1-0