सर्बिया ठरला 1966 नंतर 'अशी' कामगिरी करणारा पहिला संघ; मात्र झुंजार कॅमेरूनने दिलं बरोबरीचं दुःख | FIFA World Cup 2022 Cameroon Vs Serbia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Cameroon Vs Serbia

FIFA World Cup 2022 : सर्बिया ठरला 1966 नंतर 'अशी' कामगिरी करणारा पहिला संघ; मात्र झुंजार कॅमेरूनने दिलं बरोबरीचं दुःख

FIFA World Cup 2022 Cameroon Vs Serbia : कॅमेरून आणि सर्बिया यांच्यात झालेल्या ग्रुप G मधील सामन्यात दोन्ही संघांनी 90 मिनिटाच्या खेळामध्ये प्रत्येकी 3 गोल केले. त्यामुळे हा सामना 3 - 3 असा बरोबरीत सुटला. मात्र हा सामना यंदाच्या वर्ल्डकपमधील आतापर्यंतचा सर्वात चुसशीचा सामना ठरला. कॅमेरूनने सर्बियावर 29 व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र पहिल्या हाफमधील अतिरिक्त वेळेत सर्बियाने दोन गोल करत हाफ टाईमला सामन्यात 2 - 1 अशी आघाडी घेतली. याचबरोबर सर्बिया हा पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत दोन गोल करणारा 1966 नंतरचा पहिला संघ ठरला. त्यांनी कॅमेरूनवर 148 सेकंदात दोन गोल डागले. मात्र दुसऱ्या हाफमध्ये कॅमेरूनने जोरदार मुसंडी मारत पिछाडी भरून काढली. कॅमेरूनने दुसऱ्या हाफमध्ये आपले वर्चस्व गाजवत सामना 3 - 3 असा बरोबरीत सोडवला.

हेही वाचा: Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे पार्टीतील फोटो व्हायरल; कोण आहे तो 'मिस्ट्री बॉय'

कॅमेरूनच्या जेन - चार्ल्स कॅस्टेल्लेटोने 29 व्या मिनिटाला सर्बियावर गोल केला. त्यानंतर सर्बियाला या गोलची परतफेड पहिल्या हाफच्या 45 व्या मिनिटापर्यंत करता आली नाही. त्यामुळे सामन्याचा पहिला हाफ हा कॅमेरूनच्या नावावर राहील असे वाटत होते. मात्र इंज्यूरी टाईम सुरू झाला अन् सर्बियाने सामन्याचा नूरच पालटला. अतिरिक्त वेळेच्या पहिल्या मिनिटालाच सर्बियाच्या पाव्हलोव्हिकने बरोबरी साधणारा गोल केला. या गोलला 148 सेकंदच उलटले असताना अतिरिक्त वेळेच्या तिसऱ्या मिनिटाला मिलिनकोव्हिक - साव्हिकने सर्बियासाठी दुसरा गोल करत सामन्याचे पारडे सर्बियाकडे झुकवले.

हेही वाचा: Ruturaj Gaikwad VIDEO : ऋतुराजच्या विश्वविक्रमी 'षटकातील 7 षटकार' पाहा एका क्लिकवर

अवघ्या 148 सेकंदात सामन्यावरील पकड गमावलेल्या कॅमेरूनला दुसऱ्या हाफमध्ये सर्बियाने सावरण्याची संधी न देता 53 व्या मिनिटाला तिसरा गोल करत आघाडी 3 - 1 अशी नेली. आता कॅमेरूनच्या हातून सामना गेला असे वाटत असतानाच बरोबर 10 मिनिटांनी सामन्याच्या 63 व्या मिनिटाला विन्सेट अबूबकरने कॅमेरूनला दुसरा गोल करून दिला. झुंजार कॅमेरूनने सामना अजून संपला नसल्याचे संकेत दिले. त्यानंतर अवघ्या तिसऱ्या मिनिटात म्हणजे 66 व्या मिनिटाला कॅमेरूनच्या एरिक मॅक्सिम चौऊपो - मोटिंगने सामना बरोबरीत आणणारा तिसरा गोल केला. यानंतर सर्बिया आणि कॅमेरून दोघांनीही बरोबरीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस सामना 3 - 3 असा बरोबरीत राहिला.

सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुणांवर समाधान मानावे लागले. ग्रुप G मधील ब्राझील विरूद्ध स्वित्झर्लंड सामना आज रात्री 9 वाजता होणार आहे. या सामन्यातील विजेता ग्रुप G मधून नॉक आऊट राऊंड 16 साठी पहिल्यादा पात्र होईल.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?