
fifa world cup 2022 : जपानचा स्पेनवर सनसनाटी विजय
कतार : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज जोरदार उलटफेर झाला. जपानने बलाढ्य स्पेनचा २ विरुद्ध १ गोलने पराभव करून धक्कादायक विजय नोंदवला. जपानच्या विजयानंतर स्टेडियमवरील जपानच्या चाहत्यांनी केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. या पराभवामुळे स्पेनच्या पाठीराख्यांना मोठाच झक्का बसला. जपानविरुद्ध मैदानात उतरलेला स्पेन हा सामना सहज जिंकणार असाच होरा होता, त्यामुळे स्पेनने आपले अव्वल खेळाडू मागे ठेवले; मात्र जपानने २ गोल केल्यानंतर स्पेनचा संघ जागा झाला; मात्र त्यांना जपानला नमवता आले नाही.
सामन्याच्या प्रारंभापासूनच स्पेनने जोरदार आक्रमणे केली आणि अकराव्या मिनिटाला पहिला गोल केला. अल्वारो मोराटाने मारलेला फटका थेट गोलजाळीत विसावला. त्यानंतर स्पेनच्या खेळामध्ये शैथिल्य आले, तर जपानने मात्र इर्ष्येने खेळ केला आणि स्पेनवर सातत्याने आक्रमणे केली. जपानच्या रित्शु डोआन याने ४८ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. या धक्क्यातून स्पेन सावरतो न सावरतो तोच तीन मिनिटांनंतर ५१ व्या मिनिटास आवो तानाका याने गोल केला आणि जपानला विजयी आघाडी मिळवून दिली. या धक्क्यानंतर खडबडून जागे झालेल्या स्पेनने प्रतिआक्रमणे रचली; मात्र त्यांना गोल बरोबरी साधता आली नाही
आणि जपानने स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदविला.