Fifa World Cup 2022: मंदीत सुद्धा संधी, फिफा वर्ल्डकप मध्ये भारत नाही पण तरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nikhil Kadam

Fifa World Cup 2022: मंदीत सुद्धा संधी, फिफा वर्ल्डकप मध्ये भारत नाही पण तरी...

फुटबॉल फिवर अगदी वाढता आहे. कोल्हापूर तर फुटबॉलवेड्यांचे शहर. येथील स्थानिक स्पर्धांवेळीच कित्येक हजार प्रेक्षक उपस्थिती लावतात. येथे आंतरराष्ट्रीय खेळाडूही अगदी वाटून घेतलेले आहेत. यंदा फुटबॉलप्रेमींचे सर्वाधिक लक्ष संघांकडे जसे लागलेले असते तसेच खेळाडूंकडेही. माझ्या मते यंदा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्याकडेच सर्वांचे अधिक लक्ष असेल. ही विश्‍वकरंडक स्पर्धा कदाचित दोघांची अखेरची असू शकते. त्यानंतर निवृत्तीचे संकेत दोघांनीही या आधी दिले आहेत. त्यांच्यासह ब्राझीलचा व्हिनेसिस ज्युनिअर, फ्रान्सचा एम्बापे, स्पेनचा फेड्री, यंदाचा गोल्डन बॉय स्पेनचा गावी यांचे फुटबॉल कौशल्य पाहण्याची संधी फुटबॉल प्रेमींना पहावयास मिळणार आहे.

तंदुरुस्तीकडे लक्ष

युरोपमध्ये वर्षभर फुटबॉल स्पर्धा सुरू असतात. क्लब व देशांतर्गत स्पर्धांमुळे फुटबॉलपटूंना शारीरिक तंदुरूस्तीची तयारी करावी लागते. त्यासाठी ते सतत दक्ष असतात. त्याचबरोबर त्यांच्या संघव्यवस्थापनाचेही त्यांच्यावर बारकाईने लक्ष असते. पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन असल्यामुळे क्लब खेळाडूंची तंदुरूस्ती व आहारावर खूप काम केले जाते. खेळाडूंना कमीत कमी दुखापत होईन ते दुखापतीपासून कसे दूर राहतील हे पाहिले जाते. त्या अनुषंगाने त्यांच्या खेळात टेक्निक असते. वर्षभरात त्यांना केवळ एक महिना स्पर्धेपासून विश्रांती मिळते.

बदलते वातावरण, दुखापतीचा परिणाम

हंगामाचा विचार करता दर चार वर्षांनी जून-जुलैमध्ये विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा मात्र पहिल्यांदाच स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होत आहे. त्या वातावरण बदलाचा परिणाम नक्कीच संघांच्या कामगिरीवर दिसून येणार आहे. काही संघांचे स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. आधीच्या स्पर्धांत झालेल्या दुखापतींमुळे त्यांची यंदाची विश्‍वकरंडक स्पर्धा हुकणार आहे. जर्मनीचा मार्को रियूस, टिमो वेर्णेर, फ्रान्सचा किंम्पेंबे, कांटे व पोग्बा, इंग्लंडचा रिस जेम्स, मेडिसन, दक्षिण कोरियाचा शोन मिन, पोर्तुगालचा दिएगो जोटा, मेक्सिकोचा जमेनीस या स्टार खेळाडूंची जादू पहायला मिळणार नाही, त्याची किंम्मत त्यांच्या संघांना नक्कीच मोजायला लागू शकते. युरो चषकमध्ये डेन्मार्कने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे डेन्मार्क व नेदरलँड संघ कोणाविरूद्धही घातक खेळ करू शकतात.

खेळाडू, प्रेक्षकांसाठी पर्वणी

कतारमध्ये होऊ घातलेली विश्‍वकरंडक स्पर्धा भारतासाठी उपयुक्त ठरणार आहे. मध्य आशियात ही स्पर्धा होत असल्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने ती पर्वणीच आहे. युरोपातील स्पर्धांना उपस्थिती लावणे फारसे भारती फुटबॉलप्रेमींना शक्य झालेले नाही. यंदा मात्र ती संधी आहे. भलेही भारतीय संघ स्पर्धेत नसेल. तरीही हौशी फुटबॉलप्रेमी नक्की तेथे जातील. विशेष म्हणजे कतार विरुद्ध भारतीय संघाचा सामना कतारमध्ये झाला होता. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत हा सामना बरोबरीत ठेवला होता. त्यामुळे कतारमध्ये जाऊन त्यांना पुन्हा अन्य देशांतील खेळाडूंचे कौशल्य पाहता येईल. तांत्रिकदृष्टया त्यांचे कौशल्य कोठे आहे, आपण कोठे आहोत, याचा लेखाजोखा मांडता येईल. तसेच खेळाडू कशा पद्धतीने स्वतःला तयार करतात हेही अभ्यासता येणार आहे.

गुणवत्ता जागतिक दर्जाची पण...

सध्याचा फिफाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १०६ व्या क्रमांकावर आहे. जगात देशासाठी सर्वाधिक गोल करण्यात सुनील छेत्रीचा तिसरा क्रमांक आहे. रोनाल्डो व मेस्सीनंतर त्याचा नंबर लागतो. याचा अर्थ देशातील खेळाडूंमधील फुटबॉलमधील गुणवत्ता ही जागतिक दर्जाची आहे. गेल्या चार-पाच वर्षांत भारताची प्रगती समाधानकारक आहे. भारतात यंदा १७ वर्षांखालील मुलींच्या विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. यजमान पद असल्याने देशातील मुला-मुलींना फुटबॉलचा वेगळा अनुभव घेता आला. त्यांना त्यांच्या क्षमतांचा अंदाज आला.

ग्रासरुटवर काम व्हावे

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फुटबॉलच्या प्रचार व प्रचारासाठी खूप काही करत आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्रात फुटबॉलला दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. इथल्या खेळाडूंना अन्य देशांच्या संघांसमवेत मैत्रीपूर्ण सामने खेळायला मिळत आहेत. मणीपूर राज्यातील मुले-मुली भारतीय संघात प्रतिनिधीत्त्व करत आहेत. तिथले राज्य शासनही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. कोलकत्ता असो की, केरळ तेथेही फुटबॉल प्रेम वाढतच आहे. भविष्याचा वेध घेता भारतीय फुटबॉलला आणखी उभारी देण्यासाठी ग्रासरूटवर काम करावे लागेल. मुले असतील किंवा मुली, त्यांच्यात खेळाची आवड निर्माण करावी लागेल. त्यांच्यात देशासाठी खेळण्याची अस्मिता जागवावी लागेल.