FIFA World Cup : यजमान कतार पराभूत; विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात शानदार विजयाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fifa world cup Enner Valencia qatar vs ecuador qat 0 2 ecu valencia goal soccer

FIFA World Cup : यजमान कतार पराभूत; विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात शानदार विजयाने

अल खोर (कतार) : कर्णधार एनेर व्हॅलेन्सिया याने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन शानदार गोलच्या बळावर इक्वेडोरने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रविवारी विजयी सलामी दिली. त्यांनी यजमान कतारवर २-० फरकाने मात केली. ‘अ’ गटातील हा सामना अल बय्त स्टेडियमवर झाला. व्हॅलेन्सियाने कर्णधारास साजेशी कामगिरी बजावताना संघाला विश्रांतीपूर्वी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याने १६व्या मिनिटास पेनल्टीवर यावेळच्या विश्वकरंडकातील पहिला गोल केला. नंतर त्यानेच ३१व्या मिनिटास शानदार हेडिंग साधले. विश्वकरंडक फुटबॉलमध्ये पदार्पण करणाऱ्या यजमान कतारसाठी हा निकाल निराशाजनक ठरला. स्पर्धेच्या सलामीस पराभूत होणारे ते पहिले यजमान ठरले. २०१९ मधील सामन्यात पॅराग्वेविरुद्ध ०-२ फरकाने मागे पडल्यानंतर कतारने बरोबरी नोंदविली होती, पण यावेळेस घरच्या मैदानावर त्यांना इक्वेडोरविरुद्ध तशी किमया साधता आली नाही.

सामन्याच्या सुरवातीस इक्वेडोरने आघाडी घेतली, पण एनर व्हॅलेन्सियाचा गोल ऑफसाईड ठरविला गेला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास इक्वेडोरच्या कर्णधाराने शानदार हेडिंगने चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली, मात्र दोन मिनिटानंतर ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाच्या मदतीने हा गोल अवैध ठरविण्यात आला.

व्हॅलेन्सियाने संधी साधली

इक्वेडोरला आघाडीसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. पेनल्टीवर व्हॅलेन्सियाने यावेळच्या विश्वकरंडकातील पहिला गोल नोंदविण्याचा मान मिळविला. कतारच्या साद अल शीब याने प्रतिस्पर्धी कर्णधारास गोलक्षेत्रात पाडले. यावेळी ३३ वर्षीय आघाडीपटूने अचूक नेम साधत संघाला आघाडी मिळवून दिली. अर्ध्या तासाच्या खेळानंतर इक्वेडोरच्या खाती आणखी एका गोलची भर पडली. यावेळेस व्हॅलेन्सियाचे हेडिंग अचूक व भेदक ठरले. अँजेलो प्रेसियादो याच्या शानदार क्रॉस पासवर व्हॅलेन्सियाचे वेगवान हेडिंग रोखणे कतारच्या गोलरक्षकास अजिबात शक्य झाले नाही.

दृष्टिक्षेपात...

  • कतारविरुद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये इक्वेडोरचे आता २ विजय

  • इक्वेडोरतर्फे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान एनेर व्हॅलेन्सियाला, त्याचे आता ७५ लढतीत ३७ गोल

  • विश्वकरंडक फुटबॉल सलामी लढतीत २ गोल करणारा व्हॅलेन्सिया पाचवा फुटबॉलपटू

    - सामन्यात ६७,३७२ फुटबॉलप्रेमींची उपस्थिती

  • सामन्यात इक्वेडोरचे ५३ टक्के, तर कतारचे ४७ टक्के वर्चस्व

  • इक्वेडोरचे टार्गेटच्या दिशेने ३ फटके

  • इक्वेडोरचे ६, तर ५ फटके गोलच्या दिशेने

  • इक्वेडोरचे ४८६, तर कतारचे ४३४ पासेस

टॅग्स :sportsfifaFootball