fifa world cup : वर्ल्डकप स्पर्धेत पोर्तुगालचा संघ आज घानाशी भिडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

fifa world cup : वर्ल्डकप स्पर्धेत पोर्तुगालचा संघ आज घानाशी भिडणार

दोहा : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यामधील वादाचा फटका पोर्तुगालच्या विश्‍वकरंडकातील मोहिमेला बसण्याची शक्यता आहे. दोघांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण मागे सारून रोनाल्डो खेळावर लक्ष केंद्रीत करील, अशी चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पोर्तुगालचा संघ ‘ह’ गटातील सलामीच्या लढतीत घाना या देशाशी दोन हात करणार आहे.

रोनाल्डो पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना युरो करंडक जिंकण्याची किमया त्यांनी साधली, पण विश्‍वकरंडकाच्या जेतेपदावर मोहोर त्यांना उमटवता आलेली नाही. रोनाल्डो आता ३७ वर्षांचा आहे. वाढत्या वयासोबत त्याच्या खेळामध्येही घसरण होत आहे. ही त्याची अखेरची विश्‍वकरंडक स्पर्धा असणार आहे. त्यामुळे पोर्तुगालला विश्‍वविजेतेपद मिळवून देण्यात तो सर्वस्व पणाला लावील असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ब्रुनो फर्नांडिस, डिओगो डालोट, बर्नांडो सिल्वा, रुबेन डियास, जोओ कॅन्सेलो या खेळाडूंकडूनही पोर्तुगालला चमकदार कामगिरीची आशा आहे.

दृष्टिक्षेपात

पोर्तुगालचा संघ २००२ पासून सलग विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरत आहे.

पोर्तुगालने १९६६ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडकात तिसरे स्थान पटकावले होते (ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी).

पोर्तुगालने २००६ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडकात चौथे स्थान पटकावले होते.

घानाचा संघ २००६ मध्ये पहिल्यांदाच विश्‍वकरंडकात सहभागी झाला.

घाना संघाला २०१८ विश्‍वकरंडकासाठी पात्र होता आले नाही.

दक्षिण कोरियाला दुखापतीची चिंता

आशिया खंडातील दक्षिण कोरिया व दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे यांच्यामध्ये लढत होणार आहे. याप्रसंगी दक्षिण कोरियाला कर्णधार सन मिन याच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. त्याच्या डाव्या डोळ्यांना दुखापत झाली असून उद्याच्या लढतीत त्याच्या खेळण्यावर प्रश्‍नचिन्ह आहे. दरम्यान, उरुग्वेच्या संघात अनुभवी व युवा अशा खेळाडूंचे मिश्रण आहे. लुईस सुआरेझ व एडीनसन कवानी या अनुभवी खेळाडूंसह डार्विन नुनेझ या खेळाडूवरही मदार आहे.