esakal | आज पुन्हा अर्जेंटिनाविरुद्ध ब्राझील
sakal

बोलून बातमी शोधा

आज पुन्हा अर्जेंटिनाविरुद्ध ब्राझील

आज पुन्हा अर्जेंटिनाविरुद्ध ब्राझील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्युनोस आर्यस : दोन महिन्यांपूर्वी कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लढणारे अर्जेंटिना आणि ब्राझील उद्या पुन्हा आमनेसामने येत आहेत. विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील ही लढत आहे. दोन महिन्यांपूर्वी या दोन बलाढ्य देशांतील सामना ब्राझीलमध्ये झाला होता. उद्याची लढत अर्जेंटिनात होणार आहे. अर्जेंटिनाने ब्राझीलला हरवून कोपा करंडक जिंकला होता, उद्याही ब्राझीलचा संघ दडपणाखाली असू शकेल, कारण कोरानासंदर्भातील ब्रिटनच्या नियमानुसार सध्या लंडनमध्ये प्रीमियर लीग खेळत असलेल्या नऊ खेळाडूंना लंडनबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

उद्याच्या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा लिओनेल मेस्सी आणि नेमार यांच्यातील लढतीवर असणार आहे, गुरुवारी झालेल्या सामन्यात व्हेनेझुएलाच्या एड्रियन मार्टिनेझने मेस्सीलाअवैधपणे टॅकल केल्यामुळे त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले होते. मेस्सी नुकताच नेमार खेळत असलेल्या पीएसजी संघात दाखल झालेला आहे. या दोघांची फारच चांगली मैत्री आहे. व्हेनेझुएलामध्ये ३-१ अशा विजयानंतर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी म्हणाले, ‘आता मागचा विचार न करता आम्ही पुढच्या सामन्याला प्राधान्य देणार आहोत. ब्राझीलविरुद्धची ही लढत आमच्यासाठी महत्त्वाची आहे.’

ब्राझीलने ७ सामन्यांतून २१ गुणांची कमाई केली आहे. ते दक्षिण अमेरिकन पात्रता गटात आघाडीवर आहेत; तर अर्जेंटिना १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

ब्राझीलचे मार्गदर्शक टिटे यांनी गुरुवारी चिलीविरुद्धच्या १-० विजयात चार फॉरवर्ड खेळवले होते. हीच रणनीती ते उद्याच्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यातही अवलंबण्याची शक्यता आहे.

loading image
go to top