esakal | लढत इटलीविरुद्ध, लक्ष एशियाडवर 
sakal

बोलून बातमी शोधा

Fight against Italy, focus on Asiad

लढत इटलीविरुद्ध, लक्ष एशियाडवर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लंडन / मुंबई : विश्‍वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारताची उद्या इटलीविरुद्ध महत्त्वाची क्रॉसओव्हर लढत होईल. ही लढत जिंकल्यास भारतास उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेलच, पण त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असलेली आपली ताकदही भारतास दाखवता येईल. 

अमेरिकेविरुद्धची लढत 1-1 बरोबरीत सोडवून भारतीय महिला संघ क्रॉसओव्हर लढतीस पात्र ठरला. भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या इटलीने प्राथमिक गटसाखळीत दोन आशिया संघांना हरवले आहे. त्यामुळे इटलीविरुद्धची लढत भारतास महत्त्वाची आहे. इटली नेदरलॅंड्‌सविरुद्ध 1-12 असे पराजित झाले, पण त्यांनी चीनचा 3-0 आणि आशिया चॅम्पियन्स विजेत्या कोरियाला 1-0 असे हरवले. भारताने यापूर्वीची इटलीविरुद्धची लढत जिंकली आहे, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. 

आम्ही प्रतिस्पर्ध्यांची ताकद लक्षात न घेता आमच्या भक्कम बाजू लक्षात घेऊन तयारी करीत आहोत. या लढतीत पूर्ण जोशातच खेळावे लागेल. इटलीचा संघ चांगला आहे. त्यांनी स्पर्धेत प्रभावी कामगिरीही केली आहे. आपण इटलीला हरवू शकतो, या विश्‍वासानेच आम्ही मैदानात उतरणार. 2015 च्या वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आम्ही इटलीस हरवले होते. हा विजय नक्कीच आम्हाला प्रेरणा देईल, असे भारतीय कर्णधार राणी रामपालने सांगितले. 

अमेरिकेविरुद्ध आम्हाला बरोबरी पुरेशी होती, पण तरीही आम्ही विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरलो होतो, त्याचाच फायदा झाला. दडपणाची स्थिती घेऊन सराव सामने खेळत आहोत. आम्ही चांगला खेळ केला, तर चाहत्यांचे प्रोत्साहन लाभेल, असेही राणीने सांगितले.

विश्‍वकरंडक महिला हॉकी 
भारत वि. इटली 
थेट प्रक्षेपण : रात्री 10.25 स्टार स्पोर्टस टू तसेच डीडी स्पोर्टस 

loading image
go to top