esakal | टोकियो ऑलिम्पिकमध्ये आढळला पहिला कोरोना संक्रमित
sakal

बोलून बातमी शोधा

tokyo olympics

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आढळला पहिला कोरोना संक्रमित

sakal_logo
By
विनायक होगाडे

टोकियो: यंदा होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं सावट आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाची महासाथ पसरलेली असताना ऑलिम्पिकसारखी जागतिक क्रीडा स्पर्धा घेणं आव्हानात्मक आहे. या स्पर्धांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक गतीने वाढेल, अशी भीती सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे. पण ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमुळे जपानमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता शून्य असल्याचं स्पष्ट प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी व्यक्त केलं होतं. मात्र, त्यांचं हे मत आता चुकीचं ठरेल, अशी बातमी समोर आली आहे. जपानमधील टोकियो ऑलिम्पिक व्हीलेजमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडणार आहे, त्या गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. जपानमधील कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, बाक यांनी व्यक्त केलेलं हे मत आता चुकीचं ठरलं आहे.

ऑलिंपिकसाठी क्रीडापटू तसेच पदाधिकारी टोकियोत येण्यास सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये आलेल्या ८ हजार जणांची आत्तापर्यंत चाचणी करण्यात आली. त्यातील काहीजण तिथे बाधित आढळले आहेत. या बाधितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडानगरी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता शून्य आहे, असे बाक म्हणाले. टोकियोच्या प्रांतप्रमुख युरिको कोईके, संयोजन समितीचे अध्यक्ष सेईको हाशीमोतो यांच्याशी चर्चेच्यावेळी बाक यांनी ही टिप्पणी केली.

ऑलिंपिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक आठवडा टोकियोत १ हजार ३०८ बाधित आढळले. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धा संयोजनाचा विरोध वाढत आहे. स्पर्धा विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. त्यावर साडेचार लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होणार हे सांगितले जात आहे. पण हे कितपत सुरक्षित आहे, अशी विचारणा होत आहे. केनियाच्या महिला रग्बी संघातील खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले. मात्र या खेळाडू आलेल्या विमानातील एक प्रवासी बाधित आढळला. या खेळाडू त्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. मात्र त्यानंतरही संघाचा मुक्काम क्रीडानगरीतच आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.

loading image