कबड्डीतील नवा अध्याय जोडण्यासाठी पुणे सज्ज 

होनप्पा गौडा 
सोमवार, 13 मे 2019

पुण्यापासून सुरू होणारा हा लीगचा प्रवास 19 दिवस चालणार असून, या दरम्यान एकूण 44 सामने होणार आहेत. बंगळूर येथील कांतीरवा स्टेडियममध्ये लीगचा अंतिम सामना होईल तेव्हा कबड्डीतील गमावलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी आपण एक भक्कम पाऊल टाकलेले असेल. 
सर्व सहभागी संघांना शुभेच्छा !

पहिल्या इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगच्या (आयपीकेएल) निमित्ताने कबड्डीतील नव्या अध्यायासाठी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे.

"अ' गटातील पहिल्या सामन्यात यजमान पुणे प्राइड संघाची गाठ हरियाना हिरोज संघाशी पडणार आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात पुणे आणि हरियाना शहराचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे या दोन संघांत पहिला सामना होणे यासारखा वेगळा आनंद नाही. 

भारताचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू जितेंद्र यादव आणि व्यावसायिक व्ही. विमल राज यांच्यामुळे पुणे संघाची ताकद वाढल्यासारखी दिसून येते. त्याच वेळी हरियाना संघही उदयोन्मुख खेळाडूंच्या समावेशामुळे त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करू शकतो. साहजिकच या दोन संघांमध्ये एक तुल्यबळ सामना आपल्याला बघायला मिळेल. 

पहिल्या "आयपीकेएल'च्या उद्‌घाटन सोहळ्यात होणाऱ्या महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यामुळे या लीगला आगळे महत्त्व येणार आहे. कबड्डी खेळाला एका नव्या वाटेवर नेण्याचा शब्द "आयपीकेएल'ने या निमित्ताने खरा करून दाखवला आहे. केवळ हा एकच नाही, तर महिलांचा दुसरा प्रदर्शनीय सामना लीगच्या अखेरच्या टप्प्यात बंगळूर येथे खेळविला जाणार आहे. सेलिब्रिटींच्या लक्षवेधक परफॉर्मन्समुळे नक्कीच चाहत्यांचा उत्साह वाढणार आहे. 

खेळ अधिक वेगवान आणि आक्रमक व्हावा या दृष्टीने "आयपीकेएल'चे नियम निश्‍चित करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक चढाईत गुण मिळण्याची खात्री देता येईल. एकूणच कबड्डीप्रेमी या लीगच्या पद्धत आणि खेळाडूंच्या कौशल्याचा पूर्ण आनंद घेतील, यात शंका नाही. देशातील कबड्डीपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी "आयपीकेएल' हे एक हक्काचे व्यासपीठ असून, खेळाडू या संधीचा फायदा उठवतील. अलीकडच्या काळात कबड्डीत भारतासमोर आव्हान उभे राहिले असले, तरी या लीगमुळे पुन्हा एकदा भारत गतवैभव परत मिळवू शकेल, असा विश्‍वास वाटतो. 

पुण्यापासून सुरू होणारा हा लीगचा प्रवास 19 दिवस चालणार असून, या दरम्यान एकूण 44 सामने होणार आहेत. बंगळूर येथील कांतीरवा स्टेडियममध्ये लीगचा अंतिम सामना होईल तेव्हा कबड्डीतील गमावलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी आपण एक भक्कम पाऊल टाकलेले असेल. 
सर्व सहभागी संघांना शुभेच्छा !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First IPKL Started in pune from today