कोरोनानंतर भारतात प्रथमच बहुराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओडिशात आजपासून हॉकीचा जल्लोश; ; यजमान भारताची सलामी फ्रान्सशी

कोरोनानंतर भारतात प्रथमच बहुराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

भुवनेश्‍वर : भारतात कोरोनानंतर अर्थातच तब्बल २० महिन्यांनंतर बहुराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उद्यापासून करण्यात येणार आहे. भुवनेश्‍वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये बुधवारपासून ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडकाला सुरुवात होणार आहे. नवी दिल्ली, लखनौ यानंतर आता भुवनेश्‍वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेत १६ देश जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. पहिल्याच दिवशी यजमान भारताचा संघ फ्रान्सला भिडणार आहे. याप्रसंगी ओडिशात उद्यापासून हॉकीचा जल्लोश पाहायला मिळेल, असे म्हणायला हरकत नाही. ही स्पर्धा २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड या देशांनी ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडकामधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या तीन देशांऐवजी अमेरिका, कॅनडा व पोलंड या तीन देशांना या स्पर्धेत खेळण्याची वाईल्ड कार्डद्वारे संधी देण्यात आली. कोरोनामुळे ज्युनियर हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात आले नाही. यानंतर आशियाई हॉकी फेडरेशनकडून विशिष्ट गुणांची पद्धत अवलंबली. त्यानुसार पाकिस्तान, मलेशिया व दक्षिण कोरिया या तीन देशांना या स्पर्धेत सहभागी होता आले.

हेही वाचा: IND VS NZ : रहाणे फॉर्मात येईल : पुजारा

दोन महिन्यांमध्ये तयारी

ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडकाचे आयोजन भारतात अन्य ठिकाणी करण्यात येणार होते; पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. हॉकी इंडियाकडून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भुवनेश्‍वरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. सप्टेंबर महिन्यापासून या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाली. कोरोनाच्या काळात या स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात येत आहे. तसेच अवघ्या दोन महिन्यांमध्ये जागतिक स्पर्धेची तयारी करण्यात आली आहे, असे मत ओडिसा सरकारमधील क्रीडा विभागाचे आर. विनील कृष्णा यांनी व्यक्त केले. या स्पर्धेतील लढती हॉकीप्रेमींना स्टेडियममध्ये जाऊन बघता येणार नाहीत. कोरोनामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही.

सिनियर संघाच्या सान्निध्यात ज्युनियरचा सराव

भारताच्या सिनियर हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकून इतिहास घडवला. याच सिनियर संघासोबत भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने विश्‍वकरंडकाआधी सराव केला. सिनियर संघातील विवेक प्रसाद सागर याच्याकडे ज्युनियर संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच सिनियर संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचे मार्गदर्शनही भारताच्या ज्युनियर हॉकी संघाला लाभत आहे. या वेळी सिनियर संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यानेही ज्युनियर संघाला शुभेच्छा देताना म्हटले की, प्रतिकूल परिस्थितीत खेळावर फोकस ठेवल्यास नक्कीच यश मिळेल.

जर्मनीचे वर्चस्व

जर्मनी हॉकी संघाने या स्पर्धेचे सर्वाधिक सहा वेळा जेतेपद पटकावले आहे. भारताने ही स्पर्धा दोन वेळा जिंकलीय. भारताने २००१ मधील ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत अर्जेंटिनाला हरवून पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. त्यानंतर २०१६मध्ये भारत दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला.

loading image
go to top