Football : नेमार, गॅब्रिएल जीजसवर ब्राझीलची मदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Football

Football : नेमार, गॅब्रिएल जीजसवर ब्राझीलची मदार

ब्राझिलिया : पाच वेळा फुटबॉल विश्वकरंडकाचे विजेते ब्राझीलने कतारमधील आगामी स्पर्धेसाठी संघ जाहीर केला असून यात दिग्गज नेमार आणि गॅब्रिएल जीजसचा समावेश करण्यात आला आहे; तर आक्रमक फळीतील खेळाडू रॉबर्टो फर्मिनो याला स्थान देण्यात आले नाही. ३९ वर्षीय अनुभवी बचावफळीतील खेळाडू डॅनी अल्वेसलासुद्धा संधी देण्यात आली.

अल्वेस मागील दोन वर्षे बार्सिलोना क्लबकडून व्यावसायिक फुटबॉल खेळला, त्यानंतर त्याने मेक्सिकोमधील प्रसिद्ध ‘पुमस’ क्लबकडून खेळायला सुरुवात केली; मात्र सप्टेंबर महिन्यात खेळताना गुडघ्याला दुखापत झाल्याने तो गेले दोन महिने कोणत्याही प्रकारचे फुटबॉल खेळलेला नाही.

अल्वेसच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती देताना ब्राझीलच्या संघाचे मुख्य डॉक्टर फॅबिओ महसेरेदजियान म्हणाले, की ‘‘अल्वेस गेल्या काही आठवड्यांपासून बार्सिलोनाच्या वैद्यकीय आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांसह त्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. आम्हीसुद्धा त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवत असून; बार्सिलोनाकडून आलेल्या माहितीनुसार तो विश्वकरंडक खेळण्यास तंदुरुस्त आहे.’’ ‘अल्वेस एक उत्तम अनुभवी खेळाडू असून; त्याच्या अनुभवाचा फायदा आमच्या संघाला नक्कीच होईल’ असे मत ब्राझीलच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक टीटे यांनी व्यक्ती केले आहे.

ब्राझीलचा विश्वकरंडकतील ‘ग’ गटात समावेश असून; त्यांचा पहिला सामना सर्बियाशी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ग गटात ब्राझील बरोबरच स्वित्झर्लंड, कॅमरून आणि सर्बिया या संघांचासुद्धा समावेश आहे. ब्राझीलचा संघ आणि प्रशिक्षक टीटे इटलीमधील ट्यूरिन शहरात १४ नोव्हेंबर रोजी एकत्र येणार असून; पाच दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर ते १९ तारखेला कतारला प्रस्थान करणार आहेत.

संघ

गोलरक्षक : एलिसन, एडरसन, वेव्हर्टन.

बचावपटू : डॅनिलो, डॅनी अल्वेस, ॲलेक्स सँड्रो, अॅलेक्स टेलेस, थियागो सिल्वा, मार्किन्होस, एडर मिलिटो, ब्रेमर.

मधली फळी : कासेमिरो, फॅबिन्हो, ब्रुनो गुइमारेस, फ्रेड, लुकास पॅकेटा, एव्हर्टन रिबेरो.

आक्रमक फळी : नेमार, व्हिनिसियस ज्युनियर, गॅब्रिएल जीसस, अँटोनी, राफिन्हा, रिचार्लिसन, मार्टिनेली, रॉड्रिगो, पेड्रो.