फुटबॉल हंगाम किक ऑफच्या दिशेने | Football | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल

कोल्हापूर : फुटबॉल हंगाम किक ऑफच्या दिशेने

कोल्हापूर : तब्बल दोन हंगामांच्या खंडानंतर कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शनिवार (ता. १३) होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तत्पूर्वी सहभागी होणाऱ्या सर्व संघांकडून खेळाडूंच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती घेण्याचे काम केएसएकडून अंतिम टप्प्यात आले आहे.

देशातील विविध स्पर्धा हळूहळू सुरू होत असताना कोल्हापूरच्या नसानसातील फुटबॉल मात्र केव्हा सुरू होतो, याकडे खेळाडूंसह फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन हंगाम येथील फुटबॉल हंगाम स्थगित होता. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी विविध जिल्हा निवड स्पर्धा, प्रशिक्षण आणि निवड शिबिरे, तसेच राज्य स्पर्धा झाल्या. ही बाब क्रीडाप्रेमींसाठी आशादायक असून, फुटबॉल हंगामासाठी अधिक पोषक आहे.

हेही वाचा: नाशिक : बारावी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज

हंगाम सुरू करण्याबाबत केएसएकडून खेळाडू, संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे. अ, ब आणि क गटासह महिला गटाच्या स्पर्धा खेळवण्याचे प्रयत्न असणार आहेत. प्रतिवर्षी येथील हंगामाची सुरुवात डिसेंबरमध्ये होते. ऑगस्टमध्ये संघ नोंदणीने हंगामाचे बिगुल वाजते. यंदाचा हंगाम सुरू झाल्यास सर्वच संघांची मदार स्थानिक खेळाडूंवरच असणार आहे. याचा सर्वाधिक फायदा संघांसह खेळाडूंना होणार आहे.

केएसए सज्ज

कोल्हापूरच्या फुटबॉलची मातृसंस्था म्हणून ओळख असणाऱ्या केएसएने हंगाम घेण्यासाठी सज्जता ठेवली आहे. हंगाम सुरू करण्याबाबत संघ व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे.

स्पर्धा प्रेक्षकांविना

हंगाम सुरू झाला तरी स्पर्धेदरम्यान नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवाव्या लागणार असून, प्रत्येक खेळाडूंसह संघाशी निगडित प्रत्येकालाच कोरोनाची चाचणी आणि प्रतिबंधक लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे.

'केएसए हंगाम घेण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. शासनाच्या नियमांच्या अधीन राहून हंगाम घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल.'

- प्रा. अमर सासणे, फुटबॉल सचिव

loading image
go to top