esakal | नोव्हाक जोकोविचचा तिसऱ्या फेरीत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

novak-djokovic

नोव्हाक जोकोविचचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पेनच्या जॉमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४ अशी मात केली.

मुनार २१ वर्षांचा असून १५५व्या क्रमांकावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. ३१ वर्षांच्या जोकोविचने पहिल्या सेटमध्ये २-५ अशा आघाडीनंतर पकड थोडी गमावली, पण टायब्रेकमध्ये त्याने एकच गुण गमावला. पुढील दोन गेममध्येही जोकोविचला थोडे झगडावे लागले, पण या पातळीवर त्याचा अनुभव सरस ठरला. हा सामना दोन तास १९ मिनिटे चालला.

जोकोविचसमोर पुन्हा फ्रेंच प्रतिस्पर्धी असेल. त्याची १३व्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा आगुटशी लढत होईल. आगुटने कोलंबियाच्या सॅंटियागो जिराल्डो याच्यावर ६-४, ७-५, ६-३ अशी मात केली. पुरुष एकेरीत अर्जेंटिनाच्या अनुभवी जुआन मार्टिन डेल पोट्रो याने फ्रान्सच्या निकोलस माहूतवर १-६, ६-१, ६-२, ६-४ असा विजय मिळविला.

झ्वेरेवला कडवा संघर्ष
द्वितीय मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेवला ६०व्या क्रमांकावरील सर्बियाच्या ड्युसान लाजोविचने पाच सेटपर्यंत झुंजविले. अखेर झ्वेरेवने २-६, ७-५, ४-६, ६-१, ६-२ असे हरविले. शेवटच्या दोन गेममध्ये झ्वेरेवने दर्जाला साजेसा खेळ केला. या स्पर्धेपूर्वीच झ्वेरेवने आपण आता नव्या पिढीतील टेनिसपटू नसून ग्रॅंड स्लॅम जेतेपदाचे दावेदार असल्याचे भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्याला करावा लागलेला संघर्ष अनपेक्षित होता. टोमास बर्डीचला फ्रान्सच्या जेरेमी चार्डीने ७-६ (७-५), ७-६ (१०-८), १-६, ५-७, ६-२ असे हरविले. बर्डीचला १७वे मानांकन होते. 

हालेपला संयमाचे फळ
महिला एकेरीत अग्रमानांकित रुमानियाच्या सिमोना हालेपला अमेरिकेच्या ॲलिसन रिस्केविरुद्ध झगडावे लागले; पण संयमामुळे तिने २-६, ६-१, ६-१ असा विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये केवळ दोन गेम जिंकू शकलेल्या हालेपने नंतर दोनच गेम गमावले. 

ॲलिसन ८३व्या स्थानावर आहे. तिने पहिल्या सेटमध्ये तीन वेळा हालेपची सर्व्हिस भेदली. हालेपने पहिले पाच गेम गमावले होते. त्यानंतरही तिने संयम राखला. पुढील दोन सेटमध्ये तिने केवळ १४ गुण गमावले.
चौथ्या मानांकित एलिना स्विटोलिना हिने स्लोव्हाकियाच्या व्हिक्‍टोरिया कुझ्मोवा हिला ६-३, ६-४ असे हरविले. कुझ्मोवाने पहिल्या फेरीत २०१०च्या विजेत्या फ्रान्सिस्का शियावोनीला हरविले होते.

इतर प्रमुख निकाल (दुसरी फेरी) - पुरुष एकेरी - डेव्हिड गॉफीन (बेल्जियम ८) विवि कॉरेंटीन मॉटेट (फ्रान्स) ७-५, ६-०, ६-१. केई निशीकोरी (जपान १९) विवि बेनॉईट पैरे (६-३, २-६, ४-६, ६-२, ६-३.

महिला एकेरी - पेट्रा क्विटोवा (चेक ८) विवि लारा अरुआबारेना (स्पेन) ६-०, ६-४. नाओमी ओसाका (जपान २१) विवि झरिना डियास (कझाकिस्तान) ६-४, ७-५

loading image