केजरीवालांनीच केलंय दिल्लीत प्रदूषण : गंभीर

वृत्तसंस्था
Friday, 1 November 2019

प्रदूषण नियंत्रणाखाली येत नाही, तोपर्यंत दिल्लीत कोणताही क्रीडा सामना आयोजित केला जाऊ नये, असे मत व्यक्त करतानाच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले

नवी दिल्ली : प्रदूषण नियंत्रणाखाली येत नाही, तोपर्यंत दिल्लीत कोणताही क्रीडा सामना आयोजित केला जाऊ नये, असे मत व्यक्त करतानाच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. गेल्या चार-साडेचार वर्षांत प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यात केजरीवाल यांना अपयश आल्याचा आरोपही त्याने केला. 

BCCIची एक चूक आणि भुवनेश्वरचे आख्खं करिेअर धोक्यात!

"एएनआय' वृत्तसंस्थेला त्याने सांगितले, की दिल्लीकरांना भेडसावत असलेली सर्वांत मोठी समस्या प्रदूषणातही संबंधित आहे. ते आटोक्‍यात आणण्यासाठी काय उपाययोजना केली हे जनतेला सांगावे, असे आव्हान मी केजरीवाल यांना देतो. 

दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये भारत-श्रीलंका कसोटी झाली होती. त्या वेळी श्रीलंका खेळाडूंना श्‍वास घेणेही कठीण झाले होते. ते मास्क घालून खेळले तरीही आजारी पडले होते. आता या परिस्थितीत दिवाळीनंतर लगेचच दिल्लीत होणाऱ्या लढतीच्या वेळी हवा कमालीची प्रदूषित असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मी वेडा होतोय, प्लिज मला क्रिकेटपासून लांब राहुद्या!

भारतीय मंडळास दिल्लीतील प्रदूषणाची पुरेपूर कल्पना आहे. मात्र रोटेशन पद्धतीनुसारच सामन्यांची ठिकाणे ठरवली जातात. त्यानुसार दिल्लीची निवड झाली आहे. त्यातच बांगलादेश संघाच्या प्रवास कार्यक्रमामुळे पहिला सामना दिल्लीत होत आहे. मात्र प्रदूषणाचा स्तर रात्री कमी होतो, असे सांगितले जात आहे. अर्थात उपलब्ध आकडेवारीनुसार दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक 357 होता. हा खूपच खराब आहे.

असे असले तरी पहिला ट्वेंटी20 सामना दिल्लीतच होणार आहे असे गांगुलींनी स्पष्ट केले आहे.दिल्लीच्या हवेतील प्रदूषणावर आमचे नियंत्रण नाही, हे भारतीय मंडळाचे; तसेच दिल्ली संघटनेचे पदाधिकारी खासगीत मान्य करतात. दिवाळीनंतर एका आठवड्याने लढत आहे आणि रात्री प्रदूषण कमी होते. त्यामुळे प्रदूषणाचा त्रास जास्त होणार नाही, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बांगलादेश संघाचे दिल्लीत आगमन होईल आणि ते कोलकत्त्याहून मायदेशी प्रयाण करतील हे ठरल्यावरच दौऱ्याचा कार्यक्रम ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Gambhir slams Arvind Kejariwal for pollution in Delhi