जर्मनी विजयी, क्रोएशियाची बरोबरी

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

जर्मनीने युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक गटसाखळीत अव्वल स्थान मिळवताना उत्तर आयर्लंडचा पाडाव केला. बेल्जियम आणि नेदरलॅंडस्‌ने विजयी मालिका कायम राखली, पण त्याचवेळी क्रोएशियास धक्कादायक बरोबरीस सामोरे जावे लागले.

पॅरिस : जर्मनीने युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक गटसाखळीत अव्वल स्थान मिळवताना उत्तर आयर्लंडचा पाडाव केला. बेल्जियम आणि नेदरलॅंडस्‌ने विजयी मालिका कायम राखली, पण त्याचवेळी क्रोएशियास धक्कादायक बरोबरीस सामोरे जावे लागले.

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बेल्जियमने स्कॉटलंडचा 4-0 असा सहज पाडाव केला. त्यांनी सलग सहावा विजयही मिळवला, पण त्यांचा खेळ लौकिकास साजेसा नव्हता. केविन डे ब्रुएन याने तीन गोलांना सहाय्य केल्यावर संघाचा चौथा गोल केला. आमची कामगिरी जागतिक दर्जाची नव्हती. पहिल्या गोलपूर्वी आम्हाला चांगलाच संघर्ष करावा लागला. पहिल्या गोलनंतर आम्ही चांगल्या संधी निर्माण करताना प्रतिस्पर्ध्यांना फारशा संधी दिल्या नाहीत, असे कर्णधार केविनने सांगितले.

गटातील पहिले दोन संघ स्पर्धेस पात्र ठरतील. बेल्जियमने तिसऱ्या क्रमांकावरील कझाकिस्तानला 11 गुणांनी मागे टाकले आहे आणि चारच लढती शिल्लक आहेत. रशिया या गटात दुसरे आहेत. त्यांनी कझाकिस्तानला 1-0 असे हरवले.
नेदरलॅंडस्‌ने एस्टोनियाचा 4-0 असा धुव्वा उडवला. रायन बॅबेल याने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय लढतीत दोन गोल केले. या विजयानंतरही नेदरलॅंडस्‌ गटात तिसरे आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर आयर्लंड आणि नेदरलॅंडस्‌ यांच्यात तीन गुणांचा फरक आहे.

जर्मनीने उत्तर आयर्लंडला 2-0 असे पराजित करीत गटात अव्वल क्रमांक मिळवला. मार्सेल हॅलस्तेनबेर्ग याने जर्मनीस आघाडीवर नेल्यावरही जर्मनीवरील दडपण कायम होते. सार्गे नाब्री याने भरपाई वेळेत गोल करीत जर्मनीचा विजय निश्‍चित केला. नेदरलॅंडस्‌विरुद्धच्या पराभवानंतर दडपण होते. त्यातून सावरण्यास वेळ लागला, असे जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी सांगितले.

क्रोएशियाला अझरबैझानविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. क्रोएशिया गटात अव्वल असले तरी त्यांनी तिसऱ्या क्रमांकावरील हंगेरीस एका गुणानेच मागे टाकले आहे. चौथ्या क्रमांकावरील वेल्स आणि हंगेरीत चार गुणांचा फरक आहे, पण वेल्स एक सामना कमी खेळले आहेत. दरम्यान, उत्तर मॅसेडोनियाने लॅत्वियास 2-0 असे हरवून बाद फेरीच्या आशा उंचावल्या. याच गटात स्लोवेनियाने इस्राईलला 3-2 पराजित करून दुसरा क्रमांक पटकावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Germany won but Croatia forced to share points