भारतीय मल्ल सुवर्णपदकापासून वंचितच

दिनेश गुंड
रविवार, 22 जुलै 2018

नवी दिल्ली - कुमार जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारातही भारतीय मल्लांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. नवीन (५७ किलो), विशाल कालीराम (७०), सचिन गिरी (७९) यांना रौप्य, तर करणला (६५ किलो) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली - कुमार जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारातही भारतीय मल्लांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. नवीन (५७ किलो), विशाल कालीराम (७०), सचिन गिरी (७९) यांना रौप्य, तर करणला (६५ किलो) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

विशालने सुरवातीला चीन आणि जपानच्या मल्लांवर आकर्षक विजय मिळविले. अंतिम फेरीत विशालने सुरवातीलाच इराणच्या अमीर हुसेनला टांग डावावर खाली घेत चार गुण मिळविले. या एका डावाने प्रेरित झालेल्या अमीरने नंतर केलेल्या प्रतिआक्रमणाला मात्र विशाल तोंड देऊ शकला नाही. अमीरने चार गुणांसह बरोबरी राखली. विशालला तीन वेळा झोनबाहेर गेल्यामुळे एकेक गुण गमवावा लागला. अमीरचा दुहेरी पट काढण्याच्या नादात त्याने आणखी गुण गमावला. पुढे अमीरने दोन ताबा गुण मिळवून पकड भक्कम केली. 

सचिनलादेखील अंतिम फेरीपर्यंत राखलेले सातत्य राखता आले नाही. इराणच्या साजीद गुलामी याने सुरवातीलाच ताबा गुण मिळविल्यावर हुकमी मोळी डावाचा सुरेख वापर करून एका पाठोपाठ आठ गुण कमावून दहा गुणांची आघाडी घेतली. याच तांत्रिक गुणांवर त्याने सुवर्ण मिळविले. त्यापूर्वी सचिनने उझबेकिस्तानच्या मल्लावर गुणांवर विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याने कोरियाच्या शीनला निकाल डावावर कोंडीत पकडले आणि दुसऱ्या फेरीत शीनला चीतपट केले.

नवीन अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या गुलाबजोनकडून पराभूत झाला. गुलाबजोनची सुरवात ताबा गुणाने झाली. त्यानंतर भारंदाज डावावर आणखी दोन गुण घेत त्याने चार गुणांची आघाडी घेतली. नवीनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.  पण, त्या नादात झोनबाहेर गेल्यामुळे त्याला एक गुण गमवावा लागला. दुसऱ्या पद्धतीत अशाच प्रकारचा फायदा नवीनला मिळाला. पण, पुढे तो गुलाबजोनचा बचाव भेदू शकला नाही. नवीनने त्यापूूर्वी मंगोलियाच्या तुमेनसोगतला पराभूत केल्यावर तुल्यबळ इराणच्या रेझा मोहसीनला चुरशीच्या लढतीत ६-५ असे एका गुणाने हरवून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. 

करणने ब्राँझच्या लढतीत तुर्कमेनीस्तानच्या होमा देव याच्यावर भारंदाज डावाचा सुरेख वापर करून ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही 
आघाडी कायम राखत त्याने विजय मिळविला. 

Web Title: global wrestling competition indian wrestler