esakal | धोनीच्या निवृत्तीची चर्चा व्यर्थ : पॉल हॅरिस
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

धोनीच्या निवृत्तीची चर्चा व्यर्थ : पॉल हॅरिस

sakal_logo
By
संकेत कुलकर्णी

औरंगाबाद : महेंद्रसिंग धोनीने आता निवृत्त व्हावे, अशा चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यातील असामान्य खेळाडू आजही जिवंत आहे. तो कधीही सामन्याचे चित्र पालटू शकतो, असा विश्‍वास दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू पॉल हॅरिस याने व्यक्त केला.

युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यासाठी पॉल हॅरिस शहरात आला आहे. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलच्या मैदानावर रविवारी (ता. 20) आणि सोमवारी (ता. 21) चालणाऱ्या प्रशिक्षण सत्रांच्या पार्श्‍वभूमीवर पॉलने शनिवारी (ता. 19) पत्रकारांशी संवाद साधला.

धोनीच्या निवृत्तीबद्दल चालणाऱ्या चर्चांना काहीही अर्थ नाही असे सांगतानाच, धोनीकडे आजही मॅच विनर खेळाडू म्हणून पाहिले जाते. त्याचा फिटनेस चांगला असून, आणखी काही वर्षे तो भारतासाठी खेळू शकतो. किमान 85 टक्के सामने तरी त्याने एकहाती भारताला जिंकून दिले आहेत, अशी पुस्तीही पॉलने जोडली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह आज आघाडीचे खेळाडू आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला या दोघांचा सामना कसा करायचा, याचाच अधिक विचार करावा लागतो, असे मत पॉल हॅरिसने व्यक्त केले.

भारतीय संघाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी अतिशय आशादायक आहे. फलंदाजीसह गोलंदाजीचीही धार वाढल्यामुळेच प्रतिस्पर्धी देशांचे संघ टिकाव धरू शकत नसल्याची स्थिती आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत कोहलीची कामगिरी उत्कृष्ट आहे, असेही तो म्हणाला.

संघाचा बॅक-अप चांगला

पूर्वी भारतीय संघाकडे चांगले फलंदाज होते; मात्र गोलंदाजांची उणीव भासत असे; मात्र आता बुमराह, रवींद्र जडेजा यांच्यासारखे गोलंदाज तर आहेतच पण 11 जणांच्या संघासाठी किमान 30 ते 40 जणांच्या नावाचा विचार करता येईल, असा बॅक-अप फोर्स भारताकडे आहे. सध्याच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेबरोबरच भारतीय संघ प्रत्येक ठिकाणी वर्चस्व सिद्ध करेल, असा विश्‍वास पॉलने व्यक्त केला.
 

loading image
go to top