esakal | ग्रॅंड स्लॅमचा महासंग्राम आजपासून 
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रॅंड स्लॅमचा महासंग्राम आजपासून 

ग्रॅंड स्लॅमचा महासंग्राम आजपासून 

sakal_logo
By
पीटीआय

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी माजी विजेता रॉजर फेडरर आणि अग्रमानांकित अँजेलिक केर्बर यांच्यावर लक्ष असेल. 

फेडररसमोर ऑस्ट्रीयाच्या जुर्गन मेल्झर याचे आव्हान असेल. मेल्झरने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फेडररला सहा महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला. त्याला 17वे मानांकन आहे. 35व्या वर्षी फेडररला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 

अग्रमानांकित अँडी मरे याची युक्रेनच्या इल्या मार्चेन्को याच्याशी लढत होईल. मरेला या स्पर्धेत पाच वेळा अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. यात चार वेळा नोव्हाक जोकोविच याच्याकडून तो हरला. इतर प्रमुख खेळाडूंमध्ये स्टॅन वॉव्रींका आणि केई निशीकोरी यांचा समावेश आहे. स्टॅनसमोर स्लोव्हाकीयाच्या मार्टिन क्‍लिझॅन, तर निशीकोरीसमोर आंद्रे कुझ्नेत्सोव याचे आव्हान असेल. 

महिला एकेरीत अँजेलिकसमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल. गेल्या आठवड्यात विषाणूसंसर्गामुळे ती आजारी होती. तिची युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्को हिच्याशी लढत होईल. 

नदालकडे लक्ष 
स्पेनच्या रॅफेल नदाल याने माजी फ्रेंच विजेते देशबांधव कार्लोस मोया यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नदालला गेली दोन वर्षे ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. काका टोनी यांच्याशिवाय त्याने एखाद्या माजी विजेत्या खेळाडूला "सुपर कोच' म्हणून नियुक्त करावे, असे त्याच्या बऱ्याच चाहत्यांना वाटत होते. अखेर नदालने हा निर्णय घेतला, पण त्याचा एवढा ऊहापोह करण्याची गरज नसून ही एक नेहमीचीच घटना आहे, असे नदालने स्पष्ट केले. "ग्रॅंड स्लॅम कारकिर्दीतील आव्हान कायम ठेवण्याची मला आशा आहे. सध्या मला दुखापत झालेली नाही, पण मी शंभर टक्के तंदुरुस्तसुद्धा नाही. दीर्घ काळापासून मी वेदनेशिवाय खेळू शकलेलो नाही.' मोयाविषयी तो म्हणाला, की मी 15 वर्षांचा असल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत मी त्यांच्याबरोबर सराव केला आहे. ते मॅल्लोर्कामध्येच माझ्या घराजवळ राहतात. नदालची मंगळवारी जर्मनीच्या फ्लोरियन मायेरशी लढत होईल. गेल्या वर्षी नदाल पहिल्याच फेरीत देशबांधव फर्नांडो व्हरडॅस्को याच्याकडून हरला.