हरमनप्रीतला विश्रांतीची गरज : अंजुम चोप्रा

सुमार फलंदाजी फॉर्मवरून परखड प्रतिक्रिया
हरमनप्रीतला विश्रांतीची गरज : अंजुम चोप्रा

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला मायदेशात पार पडलेल्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय मोसमात ठसा उमटवता आला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील दोन डाव व एक टी-२० सामना वगळता तिला इतर सर्व लढतींमध्ये एकेरी धावांवरच बाद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.

याच पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हिने परखड प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, की हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चमक दाखवता आली नाही. महिलांच्या बिग बॅश लीगनंतर ती थेट आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळली. व्यग्र वेळापत्रकामुळे तिला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. फलंदाजीचा फॉर्म मिळवण्यासाठी तिला विश्रांतीची गरज आहे.

अंजुम चोप्रा पुढे म्हणाली, हरमनप्रीत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह बिग बॅश स्पर्धाही खेळली. त्यामुळे सततच्या क्रिकेटमुळे थकवा हा जाणवणारच. मागील दहा आंतरराष्ट्रीय डावांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसले आहेत. तसेच हरमनप्रीत हिच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे दबाव आणखी वाढतो. याच कारणामुळे तिला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.

शेफाली, स्मृतीच्या फलंदाजीवर टीका

अंजुम चोप्रा हिने शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्या फलंदाजीवरही टीका केली. ती म्हणाली, शेफाली वर्मा हिने पदार्पण केल्यापासून सुधारणेबाबत सातत्याने बोलले जाते, पण ती सुधारणा प्रत्यक्षात मैदानात दिसून येत आहे का? हा प्रश्‍न याप्रसंगी निर्माण होतो. स्मृती मानधना हिच्या बॅटमधून धावाच निघालेल्या नाहीत, असे स्पष्ट शब्दांत अंजुम चोप्रा हिने आपले मत व्यक्त केले.

तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षणावर भर : हरमनप्रीत

ऑस्ट्रेलियाकडून वनडे व टी-२० मालिका गमावण्याची आपत्ती ओढवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, मोसमातील क्रिकेट मालिकांमधून खूप काही शिकायला मिळाले. आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका नुकतीच पार पडली. आता ब्रेक मिळणार आहे. यामध्ये तंदुरुस्ती व क्षेत्ररक्षणावर भर देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com