INDvBAN : 'चहर'चा 'कहर'; भारताच्या मालिका विजेतेपदाचे श्रे'यश'!

INDvBAN
INDvBAN

नागपूर : मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुलच्या आक्रमक अर्धशतकांनंतर गोलंदाजीत दीपक चहरने कहर करताना बांगलादेशा संघाला निष्प्रभ केले. टी 20 मध्ये 7 धावांत 6 गडी अशी सर्वोत्तम कामगिरी करत त्याने सामन्यावर आपली मोहोर उमटविली. या कामगिरीत त्याने हॅटट्रिकही साजरी केली. भारताने हा सामना 30 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. 

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर जवळपास 40 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळल्या गेलेल्या या संघर्षपूर्ण लढतीत टीम इंडियाने पाहूण्या संघापुढे विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याला सामोरे जाताना बांगलादेशचा डाव अवघ्या 144 धावांत आटोपला. मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने हॅटट्रिकसह सर्वाधिक सहा आणि शिवम दुबेने तीन गडी बाद करून भारताच्या मालिका विजयात निर्णायक योगदान दिले. 

विजयी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला चहरने दुसऱ्याच षट्‌कात लिटॉन दास व सौम्या सरकारला बाद करून भारताच्या विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यानंतर महंमद नईम व महंमद मिथूनने तिसऱ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी करून सामन्यात रंगत आणली. मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी विशेषत: दुबेने बांगलादेशची मधली फळी उध्वस्त करून भारताच्या विजयाला गवसणी घातली. बांगलदेशकडून सलामीवीर नईमने 48 चेंडूंत सर्वाधिक 81 धावा फटकावून विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. मिथूनने 29 चेंडूंत 27 धावांचे योगदान दिले. 

त्याअगोदर, बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय आघाडीचा मध्यमगती गोलंदाज शफिऊल इस्लामने फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार रोहित शर्मा व शिखर धवनला अवघ्या 35 धावांतच माघारी पाठवून अचूक ठरविला. भारताला दोन जबर धक्‍के देताना शफिऊलने प्रथम रोहितला दोन धावांवर 'बोल्ड' केले व त्यानंतर शिखरला महम्मदुल्लाहच्या हातात झेल द्यावयास भाग पाडले. डावखुऱ्या शिखरने चार चौकारांसह 16 चेंडूंत वेगवान 19 धावा काढल्या. त्यानंतर के. एल. राहुल व श्रेयस अय्यरने तिसऱ्या गड्यासाठी 41 चेंडूंत 59 धावा जोडून टीम इंडियाची घसरलेली गाडी रुळावर आणली. 

या दोघांनी मैदानाच्या चारही बाजूंनी चौकार-षट्‌कारांची आतिषबाजी करून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मालिकेत प्रथमच अर्धशतक झळकाविणाऱ्या राहुलने सात चौकारांच्या मदतीने अवघ्या 35 चेंडूंत 52 धावा फटकावल्या. राहुल तंबूत परतल्यानंतर अय्यरने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडविले. विशेषत: फिरकीपटू आतिफ हुसैनवर तो तुटून पडला.

श्रेयसने हुसैनच्या पहिल्याच षट्‌कात लागोपाठ तीन षट्‌कार खेचून स्वत:चे अर्धशतक साजरे केले. अखेर सौम्या सरकारने श्रेयसची विकेट काढून भारताच्या धावगतीवर 'ब्रेक' लावला. श्रेयसने तीन चौकार व पाच षट्‌कारांसह अवघ्या 33 चेंडूंत सर्वाधिक 62 धावा फटकावल्या. मनीष पांडे (13 चेंडूंत नाबाद 22 धावा) व युवा शिवम दुबेने (8 चेंडूंत नाबाद 9) अखेरच्या षट्‌कांमध्ये फटकेबाजी करीत भारताला 174 धावांपर्यंत पोहोचविले. बांगलादेशकडून सर्वाधिक दोन बळी टिपले. 

भारताने राजकोटमध्ये खेळलेल्या संघात एक बदल करताना अष्टपैलू कृणाल पांड्याच्या जागी मनीष पांडेला संधी दिली. 

संक्षिप्त धावफलक :

भारत : 20 षट्‌कांत 5 बाद 174 धावा (रोहित शर्मा 2, शिखर धवन 19 धावा (16 चेंडू, 4 चौकार), के. एल. राहुल 52 धावा (35 चेंडू, 7 चौकार), श्रेयस अय्यर 62(33 चेंडू, 3 चौकार, 5 षट्‌कार), रिषभ पंत 6, शिवम दुबे नाबाद 9, मनीष पांडे नाबाद 22 (13 चेंडू, 3 चौकार), शफिऊल इस्लाम 2-32, सौम्या सरकार 2-29, अल अमिन हुसेन 1-22) वि.वि. बांगलादेश : 19.2षट्‌कांत सर्वबाद 144 (लिटॉन दास 9, महंमद नईम 81 धावा(48 चेंडू, 10 चौकार, 2 षट्‌कार), सौम्या सरकार 0, महंमद मिथून 27 (29 चेंडू,2 चौकार, 1 षट्‌कार), मुशफिकूर रहिम 0, महम्मदुल्लाह 8, आतिफ हुसैन 0, अमिनूल इस्लाम 9, शफिऊल इस्लाम 4, मुस्तफिजूर रहमान 1, अल अमिन हुसैन नाबाद 1, दीपक चहर 6-7, शिवम दुबे 3- 30, युझवेंद्र चहल 1-43).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com